Mon, Mar 25, 2019 03:28
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › उत्तरेत कांदा ४०० रुपयांनी गडगडला

उत्तरेत कांदा ४०० रुपयांनी गडगडला

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:40PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

सध्या कांद्याचे बर्‍यापैकीचे भाव पाहता शेतकर्‍यांनी साडेतीन महिन्यांचा कांदा काढणी करून बाजारात आणल्याने गेल्या आठवडाभरात सरासरी 400 रुपयांनी भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. काल रविवारी उत्तरेतील पाच बाजार समित्यांमध्ये झालेल्या लिलावांत लाल, रांगडा कांद्याची आवक वाढून सरासरी भाव मात्र 1800 ते 2200 रुपयांपर्यंत निघाल्याने शेतकर्‍यांची निराशा झाली.

अहमदनगर, कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत प्रामुख्याने लाल, रांगडी कांदालागवड केली जाते. ही लागवड यंदा कमी आहे. त्यातच नैसर्गिक असमतोलामुळे अनेक भागात कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुरवठा कमी झाल्याने नोव्हेंबरपासून कांद्याच्या भावात तेजी सुरू आली होती. या कालावधीत कांद्याने चार हजारी गाठली, तर सरासरी 2600-2800 रुपयांपर्यंत निघाल्याने शेतकरी सुखावला होता. हा भाव चांगला असल्याने अनेक शेतकर्‍यांनी आपला कांदा काढणीस हातघाई करून तो बाजारात आणला होता. मात्र, सध्या तीन ते साडेतीन महिन्यांचा कच्चा कांदा बाजारात येत असल्याने व्यापार्‍यांनी कमी भावात हा कांदा सुरू केला आहे. त्यामुळे सरासरी 1800 ते 2200 रुपयांपर्यंत भावात घसरण झाली आहे.  

कल राहुरी बाजार समितीमध्ये सुमारे 13 हजार कांदा गोण्यांची आवक होऊन 3100 रुपयांप्रमाणे काही गोण्यांना भाव मिळाला, तर सरासरी मात्र 2200 रुपये इतकी राहिली. संगमनेर बाजार समितीत 13 हजार कांदा गोण्यांची आवक होऊन 500 ते 3100 रुपये भाव निघाला. येथेही सरासरी भावात दोनशे ते तीनशे रुपये कमी होऊन 2000-2200 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीमध्ये 6500 कांदा गोण्यांची आवक झाली. येथे काही गोण्यांना 3500 रुपयांचा भाव मिळाला. मात्र, सरासरी भावात येथेही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. येथे सरासरी 2000-2200 रुपये भाव निघाला. श्रीरामपूर, अकोले भागात लाल, रांगडा कांद्याची फारसी लागवड नसल्याने येथील बाजारातही हा कांदा दुर्मिळच आहे. येथे उन्हाळी कांदा निघाल्यानंतरच बाजार तेजीत येणार आहेत. 

जिल्ह्यात कांद्याची आवक वाढत असताना गुजरात, कर्नाटकमधून 1 फेब्रुवारीनंतर कांदा बाजारात येणार आहे. तसेच उन्हाळी कांदाही मार्चमध्ये बाजारात दिसणार आहे. त्यामुळे कांद्याची भाववाढ अनिश्‍चित आहे. सरकारने दोन दिवसांपूर्वी 850 डॉलरवरून हे निर्यातमूल्य 100 ने कमी करून ते 750 वर आणले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी सरकारने हे निर्यातमूल्य आणखी कमी करून कांदा निर्यातीस प्रोत्साहन दिले, तर व्यापारी कांदा न साठवता तो बाहेर पाठवतील व उन्हाळी कांद्यालाही चांगला भाव मिळेल, अशी शेतकरी व व्यापार्‍यांची अपेक्षा आहे. 

 ..तर जगाच्या बाजारपेठेत भारताच्या कांद्याला पसंती

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने वाढवलेल्या निर्यातमूल्यामुळे निर्यात बंद होऊन त्याचा व्यापारी, शेतकरीवर्गाला याचा मोठा फटका बसला. याविषयी बाजार समित्या, व्यापारीवर्ग व शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर लक्षात घेता नुकताच केंद्र सरकारने निर्यातमुल्य 850 वरून 700 वर आणत 150 डॉलरने ते कमी केले आहे. त्यामुळे कांदा निर्यातीला मोठा दिलासा मिळाला असला तरी चीन, पाकिस्तान व अन्य स्पर्धक राष्ट्रांच्या तुलनेत हे निर्यातमूल्य 300-400 रुपयांपर्यंत आणले तर भारतीय चवदार कांद्याला जगभरातून मागणी वाढणार आहे.