Sun, May 26, 2019 16:58होमपेज › Ahamadnagar › एक हजार ग्रामपंचायती झळकल्या ‘फेसबुक’वर!

एक हजार ग्रामपंचायती झळकल्या ‘फेसबुक’वर!

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMनगर : प्रतिनिधी

राज्यातील 44 हजार ग्रामपंचायतींचे व्हिलेजबुक तयार करण्यात येत आहे. फेसबुक ह्या लोकप्रिय समाज माध्यमाचा उपयोग करून ग्रामपंचायतींची सर्व प्रकारची माहिती जलद व प्रभावीपणे जगाच्या काना- कोपर्‍यात पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत जिल्ह्यातल्या 1 हजार 43 ग्रामपंचायती फेसबुकवर आल्या आहेत.

राज्य, केंद्र सरकारच्या योजना, उपक्रम, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून राबविण्यात येणार्‍या  योजना, प्रकल्प  तसेच ग्रामपंचायतींमार्फत होणारी विविध प्रकारची कामे, पुरविल्या जाणार्‍या सेवा-सुविधा यांची माहिती सर्वांना व्हावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. खेड्या-पाड्यातील अनेक नागरिक परदेशात अथवा देशाच्या दूरच्या भागात राहतात. अशा जगभरातील नागरिकांना आपल्या गावात संपर्क साधता यावा, गावाची माहिती सर्वत्र पोहोचावी यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने व्हिलेजबुक हा प्रकल्प विकसित केला आहे.

फेसबुक या समाज माध्यमावर सर्व ग्रामपंचायती, सर्व पंचायत समित्या व जिल्हा परिषदा यांचे स्वतंत्र पेज तयार करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसाठी पुण्यातील यशदा संस्थेत तीन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यात सर्व जिल्ह्यांच्या आपले सरकार सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक सहभागी झाले होते.

ह्या प्रशिक्षणात व्हिलेजबुक प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांचे फेसबुक पेज कसे तयार करायचे?, त्यावर सर्व माहिती व फोटो अपलोड कसे करायचे?, पेज तयार केल्यानंतर त्या पेजला व्हेरीफाईड कसे करायचे? याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन करण्याचा शासनाचा प्रयत्न होता. त्यासाठी फेसबुक कंपनीने मोफत सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ह्या प्रकल्पास सुरुवात करण्यात आली.

गावपातळीवर फेसबुक पेज चालविण्याची जबाबदारी ही संबंधित गावच्या ग्रामसेवक असणार आहे. तालुकापातळीवर गटविकास अधिकारी तर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पेज चालवतील. गावचा रहिवासी असलेल्या एखाद्या परदेशी गावकर्‍याला गावासाठी काही मदत करावयाची असल्यास या पेजद्वारे करता येणार आहे.  प्रशिक्षणात नगर जिल्हा परिषदेचे फेसबुक पेज सर्वोत्कृष्ठ ठरले होते.

साधता येणार थेट संवाद

ह्या फेसबुक पेजवर व्हिडीओ कॉलिंग, कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही ग्रामसेवकाशी थेट संवाद साधू शकणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर येणार्‍या विविध अडचणी तात्काळ सुटण्यास मदत होणार आहे. नगर जिल्हा परिषदेचे अधिकृत व्हिलेजबुक पेज  www.fb.com/villagebookahmednagar हे आहे.