Fri, Apr 19, 2019 12:22होमपेज › Ahamadnagar › थुंकल्याच्या रागातून एकाचा केला खून

थुंकल्याच्या रागातून एकाचा केला खून

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 10:15PMनगर : प्रतिनिधी

पाहून थुंकल्याच्या रागातून तिघांनी कामगाराच्या डोक्यात कशानेतरी घाव घालून निर्घृण खून केला. बुधवारी (दि. 25) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयुर्वेद कॉर्नरजवळील टी सेंटरजवळ ही घटना घडली. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत कोतवाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.अटक केलेल्यांमध्ये आनंद एकनाथ सकट, रवी उत्तम साठे, रोहित श्रावण केदारी (तिघे रा. साठे वसाहत, माळीवाडा, नगर) यांचा समावेश आहे. महेश बाळाप्पा बारसे (वय 35, रा. जुना बाजार, खिस्तगल्लीू, माळीवाडा) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. अटक केलेल्या तिघांना काल (दि. 26) न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 30) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मयत व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, महेश बारसे हे बुधवारी रात्री दुचाकीवरून घराकडे येत होते. आयुर्वेद कॉर्नरजवळ एका दुचाकीवरून आलेल्या तिघांची त्यांच्याशी नजरानजर झाली. त्यावेळी बारसे हे आपल्याकडे पाहून थुंकले, असा तिघांचा समज झाला. त्यांनी बारसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मद्यधुंद अवस्थेतील तिघांनी कशानेतरी बारसे यांच्या डोक्यात जोराचा फटका मारला. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन खाली पडले. त्यात महेश बारसे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघेही तेथून निघून गेले.

बारसे यांचा खून केल्यानंतर तिघे बंगाल चौकी येथे गेले. तेथे मयत बारसे यांचे पुतणे विशाल बारसे हे त्यांच्या मित्रांसमवेत गप्पा मारत होते. त्यांना तिघांनी सांगितले की, ‘तुझे चुलते महेश बारसे यांनी आम्हाला मारले आहे. तू पाहायला चल.’ त्यानंतर त्या तिघांसमवेत विशाल हे भाड्याने रिक्षा करून आयुर्वेद कॉर्नरजवळील टी सेंटरजवळ गेले. तेथे पोलिस आले होते. पोलिसांना पाहताच तिघे पसार झाले. विशाल बारसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता महेश बारसे हे मृत अवस्थेत आढळले. 

खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरविली. खून करणारे तिघे माळीवाडा, झेंडीगेट परिसरात असल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडून रत्नपारखी यांना समजली. त्यावरून त्यांच्यासह पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, कर्मचारी प्रभाकर भांबरकर, रवींद्र घुंगासे, गणेश लबडे, भारत इंगळे, शाहीद शेख आदींच्या पथकाने तिघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात विशाल बारसे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.