Tue, Jun 18, 2019 21:08होमपेज › Ahamadnagar › एक लाखाची खंडणी  घेताना एकास पकडले

एक लाखाची खंडणी  घेताना एकास पकडले

Published On: Aug 30 2018 1:15AM | Last Updated: Aug 29 2018 11:30PMनगर : प्रतिनिधी

50 लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील एक लाख रुपये स्विकारताना कैलास शिंदे यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. 29) रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कैलास शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, चितळे रस्त्यावरील व्यावसायिक परदेशी यांना शिंदे याच्याकडून गेली काही दिवसांपासून 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली जात होती. त्यातील एक लाख रुपये बुधवारी रात्री देण्याचे ठरले होते.

दरम्यान, परदेशी यांनी याबाबतची सर्व माहिती पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी कोतवाली पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने सापळा रचला. पोलिसांनी परदेशी यांच्याकडून 1 लाख रुपये स्विकारताना कैलास शिंदे यास रंगेहाथ पकडले. 

ताब्यात घेतलेल्या शिंदे यास कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे खंडणी नेमक्या कोणत्या कारणासाठी मागितली होती, असे समजू शकले नाही.