Fri, Mar 22, 2019 02:12
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › हुमणीचा प्रादुर्भाव वाढला

हुमणीचा प्रादुर्भाव वाढला

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:49PMभावीनिमगाव ः वार्ताहर 

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव व परिसरातील बहुतेक पिकांवर हुमणी किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. ऊस पिकावर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र कमी-अधिक प्रमाणात हुमणीच्या विळख्यात आले असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. वातावरणात होत असलेला बदल आणि पावसाचे अल्पप्रमाण, यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, दहिगावने, शहरटाकळी, बक्तरपूर, मठाचीवाडी, रांजणी व परिसरात पावसाच्या अवकृपेमुळे अनेक शेतकर्‍यांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी कसेबसे आपले पीक घेतले असले, तरी आता हुमणीच्या आक्रमणामुळे शेलक्या पिकांचे नुकसान होत आहे. जायकवाडी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात हा परिसर येत असल्याने पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, कापूस, केळी, कांदा, मका अशी नगदी पिके परिसरात घेतली जातात. अगोदरच सरासरी उत्पन्नावर परिणाम झालेला असताना हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

औषधांचा वापर करा ः साळी

वातावरणात होणार्‍या बदलामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी प्राथमिक अवस्थेत जैविक औषधांचा वापर करावा. रासायनिक औषधांनी जमिनीतील गांडूळ व जीवाणू नष्ट होतात.त्यामुळे जमिनीचा पोत खालावतो.मात्र जास्त प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास रासायनिक औषधांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांनी केले आहे.