होमपेज › Ahamadnagar › कर्जमाफीचा घोळ लवकर संपवा

कर्जमाफीचा घोळ लवकर संपवा

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 11:05PMपारनेर : प्रतिनिधी 

राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा घोळ लवकर संपवावा, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, दुधाच्या घसरलेल्या बाजारभावात सुधारणा करावी, यासह विविध मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी, यासाठी मुंबई येथे शेतकर्‍यांच्या राज्य सुकाणू समितीच्या वतीने मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले.  

शेतकरी कर्जमाफीसह शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी 1 जूनला शेतकर्‍यांनी ऐतिहासिक शेतकरी संप केला. तेव्हापासून अद्यापपर्यंत राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या एकाही मागणीची 100 टक्के पूर्तता केलेली नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकरी वर्गात सरकारबद्दल असंतोष खदखदत असतानाच, राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाकडून शेतकर्‍यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा थकीत बिलांच्या वसुलीसाठी खंडीत करण्याचा सपाटा सुरू आहे. याप्रकरणी सुकाणू समितीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ही मोहीम  ताबडतोब थांबवण्यात यावी, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या संदर्भात मी आजच संबंधितांना आदेश देऊन शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अशा सूचना देणार आहे. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर अभ्यास करून पुन्हा त्यावर चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

सुकाणू समितीने निवेदनात दिलेल्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून1 मार्चपर्यंत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत, तर सरकार विरोधात 1 मार्चपासून असहकार आंदोलन पुकारून बँकांचे कर्ज व वीजबिल न भरण्याची भूमिका शेतकर्‍यांकडून घेतली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला असल्याची माहिती राज्य सुकाणू समिती सदस्य तथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे, खजिनदार किरण वाबळे यांनी पत्रकारांना दिली.