Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Ahamadnagar › ग्रा.पं. पदाधिकारी व तक्रारदारात हाणामारी

ग्रा.पं. पदाधिकारी व तक्रारदारात हाणामारी

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:50PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील चांडगाव ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणार्‍या एका ग्रामस्थाच्या घरासमोर सांडपाणी साचत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी ही व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, पदाधिकारी व त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात  गेले. मात्र राजकीय मध्यस्थी व आपसांतील वाद चव्हाट्यावर नको, म्हणून समेट घडवून आणला. हाणामारीचा प्रकार आपसात मिटला. मात्र कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. 

चांडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात काल (दि.21) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत इमारतीच्या बाजूला राहणार्‍या एका व्यक्तीने इतर घरांतील सांडपाणी आपल्या घरासमोर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी येत असल्याने त्याची तक्रार करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित व्यक्तीत शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर वादात झाले. पाहता पाहता ग्रामपंचायत कार्यालयातच हाणामारी सुरू झाली. त्याचवेळी या व्यक्तीचे नातेवाईक कार्यालयासमोर जमा झाले. पदाधिकारी व तक्रारदाराच्या नातलगांत तुफान हाणामारी झाली. यात ग्रामपंचायत कार्यालयासातील टेबल, खुर्च्या, कपाटातील वस्तूंची तोडफोड झाली. 

काही वस्तू इतस्तः फेकून देण्यात आल्या. काही लोकांच्या अंगावर मिरचीची पूड टाकून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत अनेकांचे कपडेही फाटले.घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस दाखल होताच गावातील वातावरण शांत झाले. प्रकरण वाढल्याने दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठले. एकमेकांच्या विरोधात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू झाले. एकमेकांच्या विरोधात गुन्हे नको यात, यात अनेकांची विनाकारण नाव येतील, ही बाब लक्षात घेऊन  दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आपसात वाद  मिटविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनीही प्रकरण आपसात मिटत असल्याने सुटकेचा श्वास सोडला. हाणामारीचा प्रकार आपसात मिटला असला, तरी ग्रामपंचायत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या  नुकसानीस  जबादार कोण, नुकसानीची भरपाई देणार कोण, असे सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केले जात आहेत.