Thu, Jun 27, 2019 09:51होमपेज › Ahamadnagar › अधिकार्‍याची ऑडिओ क्‍लिप व्हायरल!

अधिकार्‍याची ऑडिओ क्‍लिप व्हायरल!

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:21PMनगर : प्रतिनिधी

पाथर्डी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकार्‍याचे एका खासगी व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची ‘क्‍लिप’ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात गुन्हा दाखल करण्याचे नियोजन केल्याचे उघड होते, असा आरोप करीत शालिनी आव्हाड यांनी काल (दि. 14) पोलिस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. 

या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पोलिस ठाण्यातील काही गैरव्यवहाराच्या सामाजिक कार्यकर्ते आव्हाड यांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांत तक्रारी केल्या होत्या. परंतु, त्यावरून संबंधितांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नव्हती. 

पोलिस ठाण्यातील गैरप्रकारांच्या तक्रारी करीत असल्याचा रागातून संबंधित सामाजि कार्यकत्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्‍याने खासगी व्यक्तीला हाताशी धरले होते. गुन्हा दाखल करण्याचे नियोजन झाले होते. परंतु, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी खातरजमा केल्याने यश आले नव्हते. हा प्रयत्न फसल्यानंतर संबंधित खासगी व्यक्तीने त्या पोलिस अधिकार्‍याला फोन केला होता. या संभाषणातून सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचे नियोजन केल्याचे लक्षात येते. त्यामुळे संबंधित अधिकार्‍याची चौकशी करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना काल (दि. 14) दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. या निवेदनावर शालिनी आव्हाड व किसन आव्हाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनासोबत संभाषणाची सीडी देण्यात आलेली आहे. 

ही क्‍लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व खासगी व्यक्तीतील संभाषण पोलिस वर्तुळासह जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीही संबंधित अधिकार्‍याविरुद्ध अनेक आरोप झालेले आहेत. आता थेट वादग्रस्त मोबाईल कॉल संभाषणाची ध्वनीफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण संबंधित अधिकार्‍याच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.