होमपेज › Ahamadnagar › शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:05AMनगर : प्रतिनिधी

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना, नगरमध्ये भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंती व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनपा कर्मचार्‍याची खरडपट्टी काढताना उपमहापौरांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली. राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून याचा तीव्र निषेध करण्यात आला असून, भाजप व उपमहापौरांवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन छिंदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमहापौरांच्या प्रभागातील कामासाठी त्यांनी मनपात कर्मचार्‍यांची मागणी केली होती. कर्मचारी न पाठविल्यामुळे त्यांनी काल (दि.16) सकाळी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन करुन चांगलेच धारेवर धरले. आधीच कर्मचारी कमी असल्याने व शिवजयंती असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे कारण या कर्मचार्‍याने दिल्यानंतर उपमहापौरांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल तसेच शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहरात उपमहापौर व भाजपाविरोधात संतापाची लाट उसळली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, शिवप्रहार संघटना, शहर वकील संघटना, मराठा सेवा संघटना, मनपा कर्मचारी युनियन आदी विविध संघटनांनी शहरात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले. 

उपमहापौरांचे पुतळेही जाळण्यात आले. छिंदम यांच्या दिल्लीगेट येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.  दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक बहिरनाथ वाकळे यांनीही एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे शहरात भारतीय जनता पार्टी बँकफूटवर गेली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. वक्तव्याच्या निषेधार्थ काल भाजप नेत्यांच्या कार्यालयांवर झालेली दगडफेक, विविध पक्ष व संघटनांकडून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चांमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून शहरासह जिल्ह्यातही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातही या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र पडसाद उमटू लागल्याने, जिल्हाधिकार्‍यांनी सर्व महसूल अधिकार्‍यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेंनी घेतली माहिती!

सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप व त्यानंतर घडलेल्या घटनांनंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपनेते अनिल राठोड यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिस अधीक्षकांकडून सर्व परिस्थितीची माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’चे प्रमुख नेते काल जिल्ह्यातच होते. अजित पवार, धनंजय मुंडे यांनी आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेची माहिती घेत, येत्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले आहे.

भाजपातून हकालपट्टी; पदाचा घेतला राजीनामा

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवरायांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर भाजप विरोधातही सर्वत्र संतापाची लाट उसळली. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी तातडीने पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर छिंदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे तसेच त्यांच्याकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे खा. गांधी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सदरचे वक्तव्य निषेधार्हच असून, भारतीय जनता पार्टी याचा तीव्र निषेध करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या : 
सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

मुख्यालये सोडू नका

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!