होमपेज › Ahamadnagar › ..आता रेशन दुकानातूनही मिळणार दूध

..आता रेशन दुकानातूनही मिळणार दूध

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 11:42PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

रेशनदुकानातून भाजीपाला, बी-बियाणे विक्रीच्या निर्णयाचे हसू झाल्यानंतर आता शासनाने रेशन दुकानात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी घेतलेल्या या निर्णयाची तरी प्रत्यक्षात अंमलबजाणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.

राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव दुकानदार गेल्या अनेक दिवसांपासून मानधन वाढीसाठी पाठपुरावा करत आहे. शासनाने प्रत्यक्षात दुकानदारांना मानधन वाढवून न देता रेशनदुकानातून अन्य वस्तू विक्रीसाठी परवानगी देवून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वीही रेशन दुकानातून भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र, याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर काहींनी तसा प्रयत्नही केला नाही. त्यानंतर बी-बियाणे रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली मात्र त्यातही शासनाला अपयशच आल्याचे दिसून आले. तसेच अंडे आणि त्यानंतर गॅस वितरणाबाबतही रेशन दुकानदारांमध्ये निरुत्साहच दिसून आला. अशाप्रकारे शासनाने यापूर्वी केलेल्या बहुतांशी घोषणा फसव्या निघाल्याचे स्पष्टपणे दिसून असतानाच आता रेशन दुकानातून दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.

महानंद दुग्धशाळेच्या अधिकृत वितरकांमार्फत रास्तभाव दुकानापर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण करण्यात येईल. महानंदाकडूनच दुकानदारांना कमिशन मिळणार आहे.  शासनाचा या व्यवहारात तसा प्रत्यक्षात कोणताही संबध नाही. मात्र तरीही हा निर्णय स्वागतार्ह आहे. ऐरवी दूध डेअरीमध्ये पायपीट करण्यापेक्षा आता नजीकच्या रेशनदुकानातून दूध व पदार्थ मिंळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. परंतु भाजीपाला, अंडी, बी-बियाणे विक्रीच्या घोषणेप्रमाणेच दूध विक्रीही कागदावर न राहता त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने कटाक्ष ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

शासनाची आणखी एक फसवी घोषणा

शासनाकडे रेशन दुकानदारांनी मानधनवाढीची वारंवार मागणी केली आहे. मात्र, मानधनवाढ न देता शासनाने फसव्या घोषणा करून आम्हाला झुलवत ठेवले आहे. यापूर्वी शासनाने रेशन दुकानातून भाजीपाला, बी-बियाणे, गॅस वितरण, अंडी विक्रीसारखे मोठे निर्णय घेतले होते. मात्र त्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. या सर्व वस्तू विक्री करण्यासाठी शीतगृहाची गरज असताना त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे हा खर्च उचलायचा कुणी ? या विवंचनेत रेशन दुकानदारांनी यामध्ये उत्साह दाखवला नाही. आता पुन्हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याची घोषणा करून त्याची शासनाने पुनरावृत्ती केल्याचे रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी सांगितले आहे.