Sat, Mar 23, 2019 12:01होमपेज › Ahamadnagar › मुळानगर ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक; पाटबंधारे विभागाच्या मनमानीवर तोंडसुख 

जीव गेला तरी येथून हटणार नाही 

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:44PMराहुरी : प्रतिनिधी 

पाटबंधारे विभागाने मुळानगरच्या 270 कुटुंबीयांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा पाठविल्यानंतर काल झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, मुळानगर ग्रामस्थांना नियमबाह्य नोटिसा पाठवून सरकारच्या परिपत्रकासह न्यायालयाच्या निकालाचा पाटबंधारे विभागाने अवमान केल्याचा आरोप करून जीव गेला, तरी चालेल. मात्र, येथून हटणार नाही, अशी प्रतिज्ञा ग्रामस्थांनी केल्याने मुळानगर एकवटलेले दिसून आले. 

मुळा धरणात विषारी औषधाचा वापर करून मासेमारी होत असल्याचा प्रकार ‘पुढारी’ने पुढे आणल्यानंतर सरकारकडून याची तात्काळ दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विषारी मासेमारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. मात्र, पाटबंधारेने मुळानगर येथील एरिगेशन कॉलनीत गेल्या 50 वर्षांपासून राहणार्‍या 270 कुटुंबांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे संतप्‍त ग्रामस्थांनी सरपंच मनीषा ढगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन रोष व्यक्त केला.

पाटबंधारे विभागाकडून मुळानगर ग्रामस्थांवर हकनाक कारवाई केली जात आहे. सरकारने परिपत्रक काढून सन 2011 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणार्‍यांना नियमित करावे, असा आदेश दिलेला आहे. तसेच औरंगाबाद खंडपीठाने 39/2014 च्या आदेशानुसार मुळानगर भागातील ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला आहे. शासन निर्णय व न्यायालयाचा निकाल मुळानगर ग्रामस्थांच्या बाजूने असतानाही पाटबंधारे विभाग या आदेशांची पायमल्ली करून मुळानगर ग्रामस्थांवर एक प्रकारे अन्याय करीत असल्याची प्रतिक्रिया ग्रामसभेत व्यक्‍त करण्यात आली. 

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे, माजी सरपंच अंकुश बर्डे, सुभाष गायकवाड, सलीम शेख, दिलीप बर्डे यांनी आपले मनोगत व्यक्‍त करून पाटबंधारे विभागाने मुळानगर ग्रामस्थांना काढलेल्या नोटिशींबाबत संताप व्यक्‍त केला. सरपंच मनीषा ढगे, ग्रामपंचायत सदस्या मंदाताई मिसाळ, सलीम शेख, रावसाहेब अडसरे, साईनाथ कदम, जालिंदर गायकवाड, पुंजाबा लकडे, शामराव पंडित, रमेश मिसाळ, शालिनीताई पोपळघट, अलका गायकवाड, शामराव पंडित, बाळासाहेब पावेल आदींसह शेकडो ग्रामस्थांची महिलांसह उपस्थिती ग्रामसभेत होती. ग्रामसभेत मुळानगर भागात शासकीय जागेत राहणार्‍यांची झोपडपट्टी म्हणून शासकीय दप्‍तरी नोंद घेत त्यास ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला देण्यात यावा, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेवरील निकालाचे अवलोकन व्हावे, मुळानगर ग्रामस्थांना शासनाच्या सोयसूविधा मिळाव्यात, आदी महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेत घेण्यात आले. 

पाटबंधारे विभागाकडून सापत्न वागणूक : लोखंडे 

मुळा एरिगेशन कॉलनीत पाटबंधारे, विद्यापीठाचे निवृत्त कर्मचार्‍यांसह धरणग्रस्त कुटुंबीय गेल्या 50 वर्षांपासून मुळानगर भागात राहतात. पाटबंधारेकडून मुळानगर ग्रामस्थांची बदनामी केली जात असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम सुरू आहे. मुळा धरणाच्या तटाला अतिक्रमण करणार्‍यांना सोडून देत मुळानगर ग्रामस्थांवर अन्याय करणार्‍या पाटबंधारे विभागाविरोधात लढा देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे.