Tue, Jul 23, 2019 10:38होमपेज › Ahamadnagar › दोन दिवसांपासून उत्तरीय तपासणीची प्रतीक्षा

दोन दिवसांपासून उत्तरीय तपासणीची प्रतीक्षा

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 19 2018 12:00AMमाळवाडगाव : वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अनिता जालिंदर आसने (वय 19) या  नवविवाहितेच्या मृत्यूबद्दल माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही शवविच्छेदन होऊ न शकल्याने मृतदेहाची अवहेलना होत असून, अंत्यसंस्कारासाठी निष्ठत बसलेल्या नातेवाईकांनाही मन:स्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.

शनिवारी (दि. 17) दुपारी 2 वाजेच्या सुमारास माळवाडगाव येथे राहत्या घरी अनिता हिने स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने तिला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची खबर सासरच्या मंडळींनी माहेरकडील लोकांनी दिली. तर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला मृत्यूची खबर दिली. 

दरम्यान, अनिता हिचे माहेर गुळज (ता. गेवराई, जि. बीड) असून माहेरच्या मंडळींना श्रीरामपूरला येण्यास उशिर झाला. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून हा आत्महत्येचा प्रकार नसून, घातपात असल्याने सासरच्या मंडळींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मयत अनिता हिचे वडील गोरख भास्कर ढोकणे यांच्यासह नातेवाईकांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करु नये अशी मागणी करत पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडले. 

पोलिस उपअधीक्षक वाकचौरे यांनी रात्री उशिरा माळवाडगावला घटनास्थळी जाऊन नवरा, सासू, सासरे यांना ताब्यात घेतले. काल सकाळी साखर कामगार रूग्णालयात शवविच्छेदनाच्या प्रसंगी दोन्ही मंडळी एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याने असा गुन्हा दाखल करु नये अशी मनधरणी करण्याचे कामही सुरू होते. परंतु नातेवाईकांनी संशयास्पद मृत्यू असल्याने खुनाच्या गुन्ह्याची मागणी केल्याने शवविच्छेदनासाठी महिला सक्षम महिला वैद्यकीय अधिकार्‍यांची श्रीरामपुरात सुविधा नसल्याने श्रीरामपूरच्या अधिकार्‍यांनी कागदपत्रे तयार करुन दुपारी 2 वा. जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर (सिव्हिल रूग्णालय) येथे रूग्णवाहिका पोलिस कर्मचार्‍यासह पाठविली. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनीही याठिकाणी महिला वैद्यकीय अधिकार्‍याची व डीएनए चाचणीची सुविधा नसल्याने घाटी रूग्णालय (औरंगाबाद) येथील पत्र नातेवाईकांना देऊन रूग्णवाहिका रविवारी रात्री 8 वा. औरंगाबादकडे रवाना झाली. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा नसून आज सोमवारी शवविच्छेदन करुन मृतदेह ताब्यात देण्याचे सांगितले.