Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Ahamadnagar › अस्तित्वात नसलेल्या जमिनीचा व्यवहार!

अस्तित्वात नसलेल्या जमिनीचा व्यवहार!

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMश्रीगोंदा ः प्रतिनिधी 

येळपणे पाठोपाठ आता ढोरजा येथेही जमिनीचा बोगस संगणकीकृत सात-बारा उतारा तयार करून खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अस्तित्वात नसणार्‍या जमिनीचा विक्री व्यवहार करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ढोरजे येथील एका गटामध्ये 3 हेक्टर 76 आर इतके क्षेत्र आहे. हस्तलिखित उतार्‍यावर हे क्षेत्र बरोबर आहे. मात्र, संगणकीकृत उतारे तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या गटामध्ये 10 हेक्टर 76 आर इतकी नोंद झाली. या गटात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी होत्या, त्यांनी तत्कालीन कामगार तलाठ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. एवढेच नाही, तर क्षेत्रासोबत दोन व्यक्तींच्या नावे वाढीव क्षेत्र लागल्याचेही निदर्शनास आणून दिले.  

दरम्यान, वारंवार मागणी करूनही वाढीव क्षेत्र आणि नावे कमी झाली नाहीत. संबंधित व्यक्तीने या जमिनीच्या सात-बारा उतार्‍याच्या आधारे एका खासगी बँकेचे सात लाख रुपयांचे कर्ज काढले. ही बाब लक्षात आल्यानंतर शेतकरी भगवान लाटे व इतरांनी बेकायदा नावे व गटावर चढविलेला बँकेचा बोजा कमी करून देण्याबाबत मागणी केली. मात्र, महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर याच गटातील 3 हेक्टर 50 गुंठे जमिनीचा 6 जुलै रोजी खरेदी-विक्री व्यवहार झाला. हा व्यवहार होत असताना संबंधिताने सात-बारा उतार्‍यावर कामगार तलाठ्याच्या बोगस सह्या करून तो वापरल्याचा आरोप लाटे यांनी केला. आमच्या गटावर चढविलेला कर्जाचा बोजा कमी करण्यात यावा व अस्तित्वात नसणार्‍या जमिनीचा विक्री व्यवहार करणार्‍या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लाटे यांनी केली आहे.यासंदर्भात बोलताना तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले की, या क्षेत्रावर कर्ज काढून बोजा चढविल्याची तक्रार प्राप्त झाली होती. प्रकरणाची शहनिशा करून तो बोजा कमी करण्याबाबत कामगार तलाठ्यांना आदेश दिले आहेत.