Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Ahamadnagar › गडापेक्षा कोणीही मोठे नाही : मुंडे

गडापेक्षा कोणीही मोठे नाही : मुंडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाथर्डीः प्रतिनिधी

मी राजकारणी असूनही हरिनाम सप्ताहामध्ये स्वतःच्या नावाच्या घोषणा ऐकत मिरवून घेणं मला अजिबात आवडत नाही. त्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. गडाच्या संघर्षाला वेगवेगळे संदर्भ दिले जातात. गड कोणताही असो त्यापेक्षा आपण मोठे नसतो, अशा खोचक शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

पाथर्डी तालुक्यातील चुंभळी येथे श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला ना.मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर कासार तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, माजी नगरसेवक चाँद मणियार, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, राजेंद्र दौंड,सीताराम बोरुडे, ज्येष्ठ नेते  बाबासाहेब ढाकणे, गहिनाथ शिरसाट, बाळासाहेब दराडे असे तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांसह  भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची मुंडे यांचे  भोवती गर्दी पडली. 

ना. मुंडे म्हणाले, गेल्या 14 वर्षापासून संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी पूजनाचा मान महंतांकडून आपल्याला दिला जातो. गहिनीनाथ गडाने खूप मोठे केले, त्या उपकारातून आपण कधीही उतराई  होऊ शकत नाही. आपल्या माणसांसाठी संघर्ष करण्याची शक्ती मिळावी. सरकारे जातात-येतात, सत्ता तर खूप अस्थिर असते. धार्मिक व्यासपीठाचा वापर राजकीय आखाडा म्हणून करणे चुकीचे असून त्यासाठी इतर जागा आहे. विधानपरिषदेचे सभागृह  सुध्दा आहे. इमानदारीसाठीची लढाई शेवटपर्यंत अशीच लढत  राहणार आहे.

आत्ताचा शेतकरी सहनशील नाही. आत्ताचे हरिनाम सप्ताह पूर्वीसारखे नाहीत.हा सगळा बदल सकारात्मक बघून आपण जगणे शिकावे. शेतकर्‍यांनो मरणाला कवटाळू नका. आपण सगळेजण मिळून जगण्याचा संघर्ष करू. संत वामनभाऊ महाराज बळ देतील यावर विश्वास ठेवा.चुंभळी येथे स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह व पुढील वर्षी व्यायामशाळेसाठी निधी देण्याची त्यांनी घोषणा केली.

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, Nobody,  greater,  Bhawan gadh,  Munde


  •