Wed, Jul 24, 2019 05:44होमपेज › Ahamadnagar › जनावरांच्या जीवाची होतेय कासावीस!

जनावरांच्या जीवाची होतेय कासावीस!

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:48PMकोपरगाव : प्रतिनिधी

‘मे’ हा कडाक्याच्या उन्हाळयाचा महिना. पण सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सूर्य आग ओकायला सुरुवात करू लागला आहे. त्याच्या झळा सध्या मोठ्या प्रमाणात कोपरगाव तालुक्यात बसू लागल्या आहे. शेतकरी रब्बी व चारा पिकांना पाणी कसे द्यावे, या विवंचनेत आहेत, तर जनावरांची चारा व पाण्याच्या शोधासाठी अन्यत्र भटकंती चालू झाली आहे. उन्हाळ्याची ही दोन महिने कशी काढायची, ही विवंचना सध्या भेडसावू लागली आहे.

चालू पावसाळी हंगामात तालुक्यात सुरुवातीला नाही, पण त्यानंतर 103 टक्के पाऊस झाला. दारणा, गंगापूर ही धरणे भरली पण पाटपाण्याचे आर्वतन उशिराने सुटल्याने शेतकर्‍यांची तारांबळ झाली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यांत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. पाऊस चांगला झाला. विहिरींना पाणी उतरले, पण सूर्याच्या प्रखर उष्णतेने ते शोषून घेतले. त्यामुळे शेतकर्‍यांना पाटपाण्याच्या आर्वतनावर अवलंबून राहावे लागले.  परिणामी जनावरांसाठी केलेल्या चारा पिकांना पाणी नसल्याने ही पिके वाळून गेली. चार्‍याचा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला.  त्यांच्याकडील पशुधन तर जगविले पाहिजे, यासाठी शेतकर्‍यांची चारा व पाण्यासाठी अन्यत्र भटकंती चालू झाली आहे.   सध्या गोदावरी नदी कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गावोगाव भटकंती करणार्‍या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी गावातील सार्वजनिक पाणवठ्याच्या जागी आसरा घ्यावा लागत आहे.  अन्य तालुक्यातील विविध देवांच्या गाव जत्रांसाठी तरुण कार्यकर्ते पाणी नेण्यासाठी कोपरगाव गोदातिरी येतात. पण गंगेचे रूप गटारगंगेत झाल्याने विहीरींचे पाणी देवासाठी घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे ही तरुण मंडळी आता कोपरगावी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तालुक्यात सध्या पाणवठे कोरडेठाक पडले, तर ग्रामपंचायतीच्या साठवण तलाव कोरडे पडले आहेत.