Wed, Feb 20, 2019 10:39होमपेज › Ahamadnagar › हत्येत राजकीय कनेक्शन नाही : केसरकर

हत्येत राजकीय कनेक्शन नाही : केसरकर

Published On: May 01 2018 1:14AM | Last Updated: May 01 2018 12:51AMनगर : प्रतिनिधी

जामखेड येथील हत्याकांड वैयक्‍तिक वादातून झालेले आहे. आतापर्यंतच्या तपासात हत्येत राजकीय कनेक्शन असल्याचे आढळून आलेले नाही, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल (दि. 30) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच जिल्ह्यातील गावठी कट्ट्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जामखेड येथील हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर केसरकर हे सोमवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना केसरकर म्हणाले की, जामखेडमध्ये घडलेले दुहेरी हत्याकांड दुर्दैवी आहे. पोलिसांनी काहींची चौकशी केलेली आहे. मारेकरी, सूत्रधार आणि साथीदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. काही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. हत्याकांडात आतापर्यंत राजकीय कनेक्शन पुढे आलेले नाही. तपासात सर्व काही निष्पन्न होईल. जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे आणि गावठी कट्टे समूळ नष्ट करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

याबात आयजी व एसपींशी चर्चा करण्यात आलेली आहे. त्याबाबतची अंमलबजावणी लवकरच दिसेल. जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी, हॉटेल व्यावसायिक, लॅडमाफिया यांच्याविरोधातही कडक भूमिका घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले.