Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › मनपा मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा!

मनपा मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा!

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 26 2018 11:34PMनगर : प्रतिनिधी

नागरिकांना स्वच्छतेबाबत उपदेश करणार्‍या महापालिकेच्या मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मनपाच्या आवारात ठिकठिकाणी कचरा साचला असून या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आलेली कचराकुंडीही आवारातून गायब झाली आहे. त्यामुळे आवारात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. साफसफाई, कचरा संकलन, शहरातील स्वच्छतेबाबत छान-छान गोष्टी सांगणार्‍या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भोंगळ कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करतांनाच शासकीय कार्यालयांमधील, आवारातील स्वच्छतेबाबतही विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडूनही स्वच्छतेबाबत कोट्यवधी रुपये खर्चून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मनपाचे अधिकारी स्वच्छतेबाबत नागरिकांना उपदेश देतात. कचरा इतरत्र न टाकता कचरा कुंडीतच टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. गेल्या काही दिवसांत इतरत्र कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाईलाही मनपाने सुरुवात केली आहे. असे असतांना मनपाच्या मुख्यालयात मात्र या उलट परिस्थिती आहे.

औरंगाबाद रस्त्यावरील महापालिका मुख्यालयाच्या आवारात अनेक वर्षांपासून कचरा कुंडीच ठेवण्यात आलेली नाही. सर्वेक्षणावेळी पथकाला दाखविण्यासाठी काही दिवस कचरा कुंडी ठेवण्यात आली होती. मात्र, सर्वेक्षण झाल्यानंतर ही कचरा कुंडी गायब झाली आहे. त्यामुळे मनपाच्या आवारातच इतरत्र कचरा टाकला जातो. त्याच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष होत असल्याने सध्या मनपाच्या आवारातच कचर्‍याचे ढीग साचले आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यालयाही याच मुख्यालयात आहे. मात्र, तेथील विभागप्रमुख, स्वच्छता निरीक्षकांकडूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला स्वच्छतेबाबत उपदेश देणार्‍या महापालिकेच्या आवारातच स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून मनपात घनकचरा व्यवस्थापन विभाग नावापुरताच राहिल्याचे दिसून येत आहे.

‘घनकचरा’ला गांभीर्य नाही : योगीराज गाडे

मनपा आवारात अनेक वर्षांपासून असाच कचरा टाकला जातो. आम्ही पाठपुरावा करुन कचरा कुंडी उपलब्ध करुन घेतली. मात्र, तीही गायब झाली. त्यानंतर घनकचरा विभागाला अनेक वेळा सूचना दिल्या. मात्र, त्यांच्याकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मनपा आवारातच कचर्‍याचा बोजवारा उडत असेल तर नागरिकांना उपदेश करणार्‍याचा मनपाला अधिकार आहे का? असा सवाल नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला आहे.

अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणार का?

मनपाचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काल (दि.26) महापालिकेच्या कामकाजाचा घेतांनाच शहरातील स्वच्छतेबाबतही सूचना दिल्या आहेत. शहरात इतरत्र कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी घनकचरा विभागाला दिले आहेत. त्यामुळे मनपा आवारातच कचरा टाकणार्‍या आणि सफाईकडे दुर्लक्ष करणार्‍या ‘घनकचरा’च्या अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.