Sun, Feb 23, 2020 09:52होमपेज › Ahamadnagar › ना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

ना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 18 2018 12:28AMपारनेर : प्रतिनिधी    

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या तीन दिवसांपासून कुकडी कार्यालयासमोर पाणी चोरी रोखण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. महसूल व पोलिस यंत्रणेस सोबत घेऊन येत्या 21 जून रोजी कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले. 

गेल्या तीन दिवसांपासून पारनेर तसेच शिरूर (जि. पुणे) जिल्ह्यातील टाकळी हाजी येथील शेतकरी मोठ्या संख्येने पाणी चोरी रोखण्याच्या मागणीसाठी कुकडी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी याच मागणीसाठी शेतकर्‍यांनी तब्बल 31 तास बैठा सत्याग्रह केला होता. त्यावेळी 44 एस. के. एफ. वरील अनधिकृत पाईप काढण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिले होते. परंतु शेतकरी आंदोलनाचे कारण पुढे करून पारनेरचे पोलिस संरक्षण देत नाहीत, हे कारण पुढे करून त्यावेळी कार्यवाही कारण्यात आली नव्हती. त्यानंतर याच मागणीसाठी शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

पाणीचोरीस पाठबळ देणारे अधिकारी दोन दिवसांनंतरही दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन वराळ यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडे त्याबाबत गार्‍हाणे मांडले. विखे यांनी तत्काळ संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करून आंदोलकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे लेखी अश्‍वासन द्यावे व वेळेत आश्‍वासनपूर्ती करण्याच्याही सूचना दिल्या. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, असेही विखे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना आश्‍वासित केले.पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी महसूल तसेच पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर शाखाधिकारी मधुकर दिघे यांनी आंदोलकांना लेखी देत येत्या 21 जून रोजी पाणीचोरीविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. उपोषणकर्ते मंगेश वराळ, सचिन वराळ यांना मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष सजीद तांबोळी व त्यांच्या सहकार्‍यांनी क्षीरखुर्मा देऊन उपोषण मागे घेण्यात आले..