Tue, Apr 23, 2019 00:18होमपेज › Ahamadnagar › विठूनामाच्या गजराने कर्जत नगरी दुमदूमली 

विठूनामाच्या गजराने कर्जत नगरी दुमदूमली 

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 10:20PMकर्जत : प्रतिनिधी

संत निवृत्ती महाराज यांच्या दिंडीचे काल (दि. 13) ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाने, गोदडमहाराज देवस्थान ट्रस्टचे पुजारी व मानकरी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व कार्यकर्ते, पोलिस, महसूल व पंचायत समितीचे अधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी, भजनी मंडळ आदींनी जंगी स्वागत केले.

दिंडीचे सायंकाळी साडेपाच वा. आगमन होताच नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत, प्रविण घुले, बापुसाहेब नेटके, नगरसेविका मनिषा सोनमाळी, वृषाली पाटील, राणी गदादे, काकासाहेब धांडे, सचिन घुले, अनिल गदादे, डॉ. बरबडे, सतिष समुद्र हे नगरसेवक गोदडमहाराज मंदिराचे विश्वस्त पंढरीनाथ काकडे, बाळू काकडे, अनिल काकडे, गोविंद काकडे, हरि काकडे, उद्धनाना भोगे, दत्तात्रय शिंदे, सुरेश खिस्ती, सुनिल नेवसे, मुख्यकार्यकारी साजिद पिंजारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजाचे समशेर शेख व इतर नागरिक देखील उपस्थित होते. सर्वांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी समर्थ विद्यालय व डायनॅमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा आणि लेझीम पथकाने स्वागत केले. 

दिंडी सोहळ्याचे प्रमुख संजय धोंडगे महाराज, मोहनमहाराज बेलापूरकर,  पुजारी अनिल गोसावी, जयंतमहाराज गोसावी, मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. पंढरीनाथ कोल्हे, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष त्रिंबक गायकवाड, विश्‍वस्त पुंडलिक थिटे यांच्यासह कर्जत वारकरी संघाचे ह.भ.प. दत्तात्रय महाराज शिंदे व ह.भ.प. सुरेश खिस्ती आणि सुमारे 45 दिंड्यांचे 50 हजार वारकरी यामध्ये सहभागी होते. दिंडी शहरात येताच रथामधून 230 किलो वजनाची चांदीची सुमारे दीडकोटी रूपये किंमतीची निवृत्तीनाथांची मूर्ती असलेली पालखी खाली उतरून ती खांद्यावर घेऊन शहरातून मिरवणुकीने मुक्काम स्थळापर्यंत नेण्यात आली. सोबत नगारखाना देखील होता. 

दिंडीची 178 वर्षाची पंरपरा 

यावेळी संजय धोंडगे महाराज यांनी सांगितले की, या दिडींची 178 वर्षांची परंपरा आहे. कर्जत येथे तिचे 178 वर्षे स्वागत करण्यात येत आहे. कर्जतनगरीत आजचा दिवस आनंदाचा असतो. निवृत्ती महाराजांच्या पालखीचे आगमन होते. अवघे कर्जत शहर स्वागतासाठी आतुर असते. आज घरोघरी वारकर्‍यांना मोठ्या भक्तीभावाने बोलावून जेवणासाठी नेण्यात येते. घरोघरी कर्जतची प्रसिध्द शिपी आमटी व भाकरी असा बेत वारकर्‍यांच्या जेवणासाठी केला जातो. ग्रामस्थ व विविध मित्र मंडळाच्या वतीने येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी क्लबतर्फे मोफत औषधे 

येथे आलेल्या हजारो वाकरर्‍यांसाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी व उपजिल्हा रूग्णालयातर्फे मोफत गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले. यामध्ये रोटरीचे अध्यक्ष नितीन देशमुख, डॉ. संदीप काळदाते, डॉ. विलास काकडे, डॉ. राजेंद्र खेत्रे, श्रीराम गायकवाड, अभय बोरा, गणेश जेवरे, नितीन तोरडमल, घनश्याम नाळे, राम ढेरे, डॉ. कांचन खेत्रे, पप्पू तोरडमल आदी उपस्थित होते. 

शहरात ठिकठिकाणी चहा व नाष्टा, आंघोळ व पिण्याचे पाणी ग्रामस्थ देतात. मुंजोबा महाराज बहुद्देशीय संस्था व न्यू फ्रेंड सर्कलतर्फे मोफत चहा व बिस्किटे देण्यात आली. त्यांचा हा उपक्रम 16 वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये मनसेचे जिल्हा प्रमुख सचिन पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र धोत्रे, नामदेव थोरात, सुपेकर यांच्यासह अनेेक युवक सहभागी झाले होते. भिमा पखाले यांनी चहाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद शाळेत पालखीचा मुक्काम असतो. तेथे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नगर परिषदेेने वारकर्‍यांसाठी पिण्याचे पाणी व आरोग्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना केली होती.