Sat, May 30, 2020 05:33होमपेज › Ahamadnagar › आगे प्रकरणात न्यायालयात अपील

आगे प्रकरणात न्यायालयात अपील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जामखेडः प्रतिनिधी

माझ्या मुलाच्या खुनातील सर्व आरोपी जर निर्दोष असतील तर मग नितीनचा खून कोणी केला? खरे आरोपी कोण आहेत? त्याचा पोलिसांनी तपास करून मला न्याय द्यावा, अशी विनवणी करत उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे मयत नितीनचे वडिल राजू आगे यांनी सांगितले.ज्यादिवशी सर्व प्रयत्न करूनही नितीनला न्याय मिळण्यात अडचणी येतील, त्यादिवशी आम्ही दोघेही नवरा-बायको शासनाच्या दारात आत्महत्या करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी घटना दि.24 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे घडली. दलित हत्याकांडाने सारा महाराष्ट्र आंदोलनाने पेटून उठला होता.या घटनेचा निकाल नगर न्यायालयाकडून  दि.23 नोव्हेंबर रोजी जाहीर होताच अनेक सामाजिक संघटना व दलित चळवळीत काम करणार्‍या नेत्यांना कार्यकर्त्यांना एक मोठा धक्का बसला. 

निकालाबाबत बोलताना आगे म्हणाले की, या प्रकरणातील सर्व साक्षीदार हे पैसे देऊन फोडण्यात आले.  पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही. या घटनेत सरकारच्या वतीने फसवी आश्वासने मिळाली. खटला जलदगती न्यायालयात चालला नाही. कुटुंबात एकाला शासकीय नोकरी देऊ, असे सांगितले परंतु नोकरी दिली नाही. जमीन देऊ केली ती दिली नाही. सरकारी वकिलाने कसलेच सहकार्य केले नाही. उलट केसच्या निकालाच्या तारीख सुद्धा सरकारी वकिलांनी सांगितले नाही. यासारखे दुसरे दुर्दैव नाही असे सांगून सरकारी यंत्रणेवरील आपला रोष बोलून दाखविला.

या संपूर्ण परिस्थितीचे खापर त्यांनी सरकारी यंत्रणेवर फोडले. विरोधक माझ्यावर सुद्धा पैसे घेतल्याचा आरोप करतात, परंतु तो गैरसमज आहे. नितीनला न्याय मिळण्यासाठी मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार आहे. ज्यादिवशी सर्व प्रयत्न करुनही नितीनला न्याय मिळण्यात अडचणी येतील त्यादिवशी आम्ही दोघेही नवरा-बायको शासनाच्या दारात आत्महत्या करून आमचे जीवन संपवू, असा टोकाचा इशारा नितीनचे वडील राजू आगे व रेखा राजू आगे यांनी ‘दै पुढारी’शी बोलताना दिला.