Tue, Mar 26, 2019 22:26होमपेज › Ahamadnagar › नगर : नीरव मोदीने लाटलेली जमीन शेतकर्‍यांना देणार

नगर : नीरव मोदीने लाटलेली जमीन शेतकर्‍यांना देणार

Published On: Mar 16 2018 12:44AM | Last Updated: Mar 16 2018 3:25PMनगर : प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याने कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे लाटलेली अडीचशे एकर जमीन मूळ शेतकर्‍यांना परत मिळण्यासाठी, पिपल्स हेल्पलाईनने आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या (दि.17) या जमिनींवर मूळ शेतकरी नांगर फिरवून ताबा घेणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

कर्जतचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या आंदोलनात अ‍ॅड.कैलास शेवाळे, मिलिंद बागल, भाऊसाहेब वाघमोडे, रघुनाथ खरात, अ‍ॅड.गवळी आदींसह ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. जमिनींवर ट्रॅॅक्टर व बैलांच्या साहाय्याने नांगर फिरवून मूळ शेतकरी आपला ताबा घेणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सत्तेवर येण्यापूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यावर भारताबाहेरील काळा पैसा तर आला नाही. उलट, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे बँकांना बुडवून देशाबाहेर पळून गेले. सामान्य माणसांऐवजी अशा ठकविणार्‍या व्यापारी, उद्योजकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. याला कारणीभूत ठरलेले अर्थमंत्री जेटली यांना प्रतिकात्मक अटक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.