Mon, Jun 24, 2019 21:17होमपेज › Ahamadnagar › काय? कर्जतच्या निम्म्या जमिनींच्या सातबार्‍यावर नीरव मोदीचे नाव

काय? कर्जतच्या निम्म्या जमिनींच्या सातबार्‍यावर नीरव मोदीचे नाव

Published On: Feb 26 2018 1:14AM | Last Updated: Feb 26 2018 11:57AMकर्जत : गणेश जेवरे

निरव मोदी व त्याच्या कंपनीच्या नावाने कर्जत तालुक्यातील खंडाळा व कापरेवाडी या महसुली गावांच्या हद्दीत तब्बल 225 एकर जमीन असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. यातील निम्म्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर निरव मोदीचे नाव असून, उर्वरित सातबारा फायर स्टोन कंपनीच्या नावाने आहे.  मोदीने मुंबईस्थित गोयल नावाच्या व्यक्तीकडून प्रत्येकी 50 हजार रुपये एकर याप्रमाणे ही जमीन खरेदी केली व त्यानंतर सोलर प्लँट उभारल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सक्तवसुली संचालनालयाने फक्त जमीनच नाही, तर सोलर प्लँटही ‘सील’ केला आहे. मोदीच्या मालकीची फायर स्टोन डायमंड प्रा. लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने खंडाळ्यातील डोंगर परिसरात सोलर प्लँट उभारला आहे. सुरवातीला फक्त मोदीच्या नावे असलेली शेतजमीन चर्चेत आली. खंडाळा येथे त्याच्या नावे 25 एकर जमिनीचा आठ-अ आहे. परंतु, त्यात खराबा जमिनीचा उल्लेख नाही. खराबा जमीन व त्याच्या मालकीची कंपनी, अशी सुमारे 225 एकर जमीन खंडाळा व कापरेवाडी गावांच्या परिसरात आहे, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे. जमिनीचा व्यवहार करून देणार्‍या व्यक्तीकडेही ‘ईडी’ने प्राथमिक चौकशी केली असल्याची माहिती आहे.

मोदीच्या कंपनीत मुंबईतील हेमंतकुमार दयालाल भटसह इतर संचालकांचा समावेश आहे. कंपनीचे मुंबईसह राज्यात इतर अनेक व्यवसाय आहेत. त्यामुळे मोदीच्या वैयक्तिक संपत्तीसह कंपनीचे व्यवहारही तपासण्यात आले आहेत. कर्जत शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर खंडाळा, गोयकरवाडा, वाघनळी या  तीन गावांमध्ये सुमारे 500 एकराचा डोंगर परिसर आहे. त्यातील बहुशांत भाग खंडाळ्यात येतो. या प्रदेश खासगी मालकीचा आहे. दगड-धोंडे असल्याने येथे काही पिकत नाही. काही क्षेत्र वनखात्याचे आहे. या डोंगरातील काही जमीन सन 2008 मध्ये मुंबई येथील गोयल आडनावाच्या व्यक्तीने काही स्थानिक शेतकर्‍यांकडून विकत घेतली होती. गोयलने 5 हजार रुपयांपासून 35 हजार रूपये एकराप्रमाणे जमीन खरेदी केली. त्यानंतर ही जमीन प्रसिद्ध हिरे व्यापारी निरव मोदी याला विकण्यात आली. मोदीने गोयलकडून प्रत्येकी 50 हजार रूपये एकराप्रमाणे जमिनीची खरेदी केली होती.

कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील गटनंबर 31,35,391, 58, 59, 61, 62, 63, 96/3, 70/1, 70/2/1, 70/2/2/1/2, 78/1 व 82 असे क्षेत्र निरव मोदी आणि फायर स्टोन कंपनीच्या नावे आहे. यामध्ये निरव मोदीच्या नावे 10 हेक्टर 7 गुंठे ही चांगली आणि तेवढीच पोट खराबा असलेली जमीन आहे. फायर स्टोन कपंनीच्या नावे 28 हेक्टर 5 गुंठे चांगली व तेवढीच पोटखराबा जमीन आहे.