Sat, Apr 20, 2019 16:04होमपेज › Ahamadnagar › निरव मोदीची २५ एकर जमीन जप्त!

निरव मोदीची २५ एकर जमीन जप्त!

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:36PMकर्जत : प्रतिनिधी

कर्जत येथील खंडाळा गावामध्ये पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा म्होरक्या निरव मोदी याची सुमारे 25 एकर जमीन होती. ती शनिवारी (दि. 24) सक्तवसुली संचलनयाच्या (ईडी) पथकाने जप्त करून सील केली. ‘एडी’चे पथक दोन आधिकारी काही दिवसांपासून कर्जतमध्ये तळ ठोकून होते. 

निरव मोदीच्या संपत्तीचे कर्जत कनेक्शन काल (दि. 24) उघड झाले. मोदी याची कर्जत तालुक्यात जेथे जमीन आहे. तेथे मुंबईस्थित अनेक बड्या उद्योजक, व्यावसायिकांच्या जमिनी आहेत. त्यात फायर स्टोन कंपनीच्या जागेचाही समावेश आहे.  

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निरव मोदी याची जमीन कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे असल्याची माहिती ‘ईडी’च्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांचे दोन अधिकारी काही दिवसांपासून कर्जत तालुक्यात ठाण मांडून होते. बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस कर्जत व खंडाळा परिसरात थांबून त्यांनी मोदी याच्या 25 एकर जमिनीबाबत माहिती मिळविली. त्यांनी खंडाळा कामगार तलाठ्यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून संबंधित जमिनीचे सातबारा उतारे मिळविले. त्या उतार्‍याआधारे कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन जमिनीचे दस्त पाहिले. त्यात निरव मोदी या व्यक्तीच्या नावाने 25 एकर जमीन खंडाळा गावात असल्याचे स्पष्ट झाले. 

मोदी याच्या मालकीच्या जमिनीत फायर स्टोन कंपनीचा सोलर प्लँट आहे. ही जमीन शनिवारी दुपारी ‘ईडी’च्या पथकाने जप्त करून ती सील करण्यात आली. या जमिनीच्या संबंधीत माहिती ‘ईडी’च्या पथकाने संकलित केलेली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.