होमपेज › Ahamadnagar › निर्भयाच्या वडिलांनी घेतली ठाकरे यांची भेट

निर्भयाच्या वडिलांनी घेतली ठाकरे यांची भेट

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:22PM

बुकमार्क करा
कर्जत : प्रतिनिधी

कोपर्डी येथील निर्भया अत्याचार प्रकरणी नगर येथील न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम राहावी, यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.

निर्भयाच्या कुटुंबीयांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. नीलम गोर्‍हे यांची भेट घेतली होती. यावेळी शिक्षा कायम राहावी, यासाठी उच्च न्यायालयातही अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आ. गोर्‍हे  यांच्यासमवेत पीडित मुलीच्या वडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख मुलीचे वडील व ग्रामस्थ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे शिवसेना भवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी समीर पाटील जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व पोलिस चौकीचे काम सुरू व्हावे, अशी मागणी करण्यात आली. याविषयी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. 

सध्या कोपर्डी येथे चौथी पर्यंत शाळा असून , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागते. त्यामुळे गावात शाळा सुरू होण्यासाठी महसूल व वन विभागाशी चर्चा करून जागा उपलब्ध करून देऊ. शैक्षणिक उपक्रमांकरिता येणारी कोणतीही अडचण पक्षातर्फे सोडवली जाईल, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी दिली. 

आ. गोर्‍हे यांनी घटना घडल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर कोपर्डी आणि कुळधरण गावाला आणि पीडितेच्या कुटुंबाला अनेक वेळा भेट दिली.तसेच वाचनालय व पुस्तके देण्यासाठी मदत केली.