होमपेज › Ahamadnagar › दुसर्‍या दिवशी 3 लाख लिटर दूध संकलन    

दुसर्‍या दिवशी 3 लाख लिटर दूध संकलन    

Published On: Jul 18 2018 1:52AM | Last Updated: Jul 17 2018 11:13PMनगर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढ आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी मात्र जिल्हाभरातील  काही शेतकर्‍यांनी विरोध दर्शवित, दूध संस्थांना दूध घालण्यास प्रारंभ केला आहे. सात दूध संस्थांनी सकाळी फक्‍त 2 लाख 99 हजार 500 लिटर दुधाचे संकलन केले आहे. या संस्थांच्या दूध वाहतूक करणार्‍या टँकरला पोलिस प्रशासनाने संरक्षण पुरविले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाभरातील  कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मात्र सतर्कता बाळगली आहे. 

राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शासनाकडून तात्काळ मिळावे, या मागणीसाठी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार सोमवारपासून (दि.16) मुंबई, ठाणे या शहरांना जाणारा दूधपुरवठा रोखण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हाभरात दूध संकलन करणार्‍या सहकारी, खासगी व इतर अशा एकूण 165 दूध संस्था आहेत. या सर्व दूध संस्थांमध्ये प्रतिदिन सरासरी  24 लाख लिटर दूध संकलन केले जाते. या आंदोलनामुळे शेतकरी देखील या दूध संस्थांकडे दूध घालण्यासाठी फिरकले नाहीत. दूध संकलन करताना आंदोलक गडबड घोटाळा  करतील, या भीतीने जिल्हाभरातील सर्वच दूध संस्थांनी संकलनच केले नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्ह्यातील दूध संकलन पूर्णतः ठप्प झाले होते. बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. काही शेतकर्‍यांनी मात्र दूधाचे मोफत वाटप केले. या आंदोलनामुळे सरासरी  पाच कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. 

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली. दूध संकलन वा दूध वाहतूक करणार्‍या गाड्यांना संरक्षण हवे असल्यास तात्काळ उपलब्ध केले जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने पहिल्याच दिवशी केले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी जिल्हाबाहेरील दूध वाहतूक करणार्‍या जवळपास 60 गाडयांना पोलिस संरक्षण देखील पुरविले गेले होते. 

पोलिस संरक्षण उपलब्ध होणार असल्याने दुसर्‍या दिवशी (दि.17)  सकाळी कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाने 95 हजार लिटर दूध संकलित केले. सोनई येथील नेवासा तालुका सहकारी दूध संघाने 20 हजार 500, निघोज येथील मळगंगाने 1 लाख 25 हजार, राहाता तालुक्यातील प्रभात संस्थेने 15 हजार, संगमनेर येथील एम.आर. थोरात संस्थेने 12 हजार, नेवासा येथील व्ही.आर. एस. संस्थेने 7 हजार तर जवखेडे खालसा येथील दूध संस्थेने 25 हजार अशा प्रकारे जिल्हाभरात एकूण 2 लाख 99 हजार 500 लिटर दूध संकलन करण्यात आले आहे.या आंदोलनामुळे जिल्हाभरात काल (दि.17) कोणताही अनुचित प्रकार  घडला नाही. दूध संकलन ठिकाणी वा दूध वाहतूक करणार्‍या गाड्यांना संरक्षण दिले गेले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.