Sat, Jul 20, 2019 08:50होमपेज › Ahamadnagar › पुढचा आमदार नागवडे, जगतापांपैकीच

पुढचा आमदार नागवडे, जगतापांपैकीच

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMश्रीगोंदा : प्रतिनिधी

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे. नागवडे किंवा आ. जगताप कुटुंबातील उमेदवार असेल. यावेळी पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे मिळून जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य होईल, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. 

श्रीगोंदा येथे राजेंद्र नागवडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती अरुण पाचपुते होते. राजेंद्र नागवडे म्हणाले, आपण घोड व विसापूरला न्याय्य हक्काचे पाणी मिळण्यासाठी लक्ष घातले व न्याय मिळवून दिला. पण काहींनी पाणी प्रश्नात  अडचणी निर्माण केल्या.विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येईल व नागवडे किंवा आ. जगताप कुटुंबातील उमेदवार असेल. यावेळी पूर्ण ताकदीने विधानसभा लढविण्याची नागवडे कुटुंबाची तयारी आहे.  

आ. राहुल जगताप म्हणाले, नागवडे कुटुंबीयांनी नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले. ग्रामीण भागात सहकार व शिक्षणाचे जाळे निर्माण केले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासात नागवडे कुटुंबाचे बहुमोल योगदान आहे. साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले, नगर जिल्ह्यात राजकारण करणे सोपे काम नाही. कार्यकर्ते दिशाहीन झाले असल्याने कार्यकर्ता शिबीर घेणे गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगाचा ’इव्हेंट’ केला जात आहे. तसेच समाज प्रलोभनांना बळी पडत आहे, ही बाब चिंताजनक आहे. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, तालुक्याच्या विकासात नागवडे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. सध्या सर्वत्र विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. केवळ सोशल मीडियावर विकासाच्या गप्पा रंगत आहेत. पण प्रत्यक्षात कामे होतात का हा चिंतेचा विषय आहे.यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवजीराव नागवडे, संपतराव म्हस्के, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, अप्पासाहेब शिंदे, नगराध्यक्ष मनोहर पोटे, अनिल पाचपुते, उपनगराध्यक्षा अर्चना गोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅॅड. अशोक रोडे यांनी प्रास्ताविक केले, तर नीलेश दिवटे यांनी सूत्रसंचालन केले.