Sun, Mar 24, 2019 04:09होमपेज › Ahamadnagar › शेवगाव-पाथर्डीसाठी नवीन पाणीयोजना

शेवगाव-पाथर्डीसाठी नवीन पाणीयोजना

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 08 2018 11:35PMशेवगांवः प्रतिनिधी

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना झाली होती. ती जुनी झाल्याने आता 180 कोटी रुपये खर्चाची नवीन योजना लवकरच केली जाणार आहे. तर या अगोदर कधीही न झालेली कामे मार्गी लावली जाती, असा दिलासा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शेवगाव येथे दिला. 

शेवगांव शहरात  स्व. राजीव राजळे यांच्या मागणीवरून ना. पंकजा मुंडे यांनी उपलब्ध केलेल्या सव्वा कोटी रुपये खर्चाच्या निधीतून महात्मा फुले भाजी मंडईच्या वास्तूचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. यावेळी त्या बोलत होत्या. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. मंचावर ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उद्योजक अमित पालवे, बीडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, पाथर्डीच्या सभापती चंद्रकला खेडकर, तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, शेवगावच्या नगराध्यक्षा राणी मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक शब्बीर शेख, उमर शेख, कमलेश गांधी, अशोक आहुजा, नगरसेवक अरुण मुंढे,  महेश फलके, सुनील रासने, दिगंबर काथवटे, विनोद मोहिते, रेखा कुसळकर, शारदा काथवटे आदी प्रमुख उपस्थित होते. 

ना. मुंडे म्हणाल्या की, शेवगांवच्या नगरसेवकांना उशीरा का होईना जाग आली. तीन मुस्लिम बांधवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मुस्लिम समाजासाठी भारतीय जनता पक्षाचे काय योगदान आहे हे त्यांना आता समजेल. शेवगांवच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी आपण घेतली आहे.सत्ता नसतांनाही स्व. राजीव राजळे यांनी शहरासाठी भाजी मंडईसाठी निधी मागितला. त्या कामाचे आज लोकार्पण होत असतांना स्व. राजळे व्यासपीठावर नाहीत याची खंत वाटते.

आ. मोनिका राजळे म्हणाल्या की, शेवगांव शहरात राष्ट्रवादीची सत्ता होती, मात्र मुस्लिम बांधवांनी काळाची पावले ओळखली. शेवगावला स्मार्ट सिटी बनवून शेवगावचा चेहरा मोहरा बदलून टाकू. कोट्यवधीची जलसंधारणाची, रस्त्याची आणि विकासाची शाश्‍वत भरीव कामे येथे साकारली आहेत. शेवगांव पाथर्डीसाठी तब्बल 180 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनाही आपण पूर्ण करणार आहोत.   नगरसेवक अरुण मुंडे यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन राजू सुरुवसे यांनी केले. तर शहराध्यक्ष रविंद्र सुरवसे यांनी आभार मानले.