Tue, Jun 25, 2019 13:40होमपेज › Ahamadnagar › आता गायीच्या जन्माचेही स्वागत!

आता गायीच्या जन्माचेही स्वागत!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ढोरजळगावः बाळासाहेब बर्गे

जर्सी गायींसाठी कृत्रिम रेतनाची नवीन पद्धत विकसित होताना आता शेतकर्‍यांना फक्त कालवडच जन्माला येणार याची खात्रीवजा आशा नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध झाली आहे.
यापूर्वी गायींच्या कृत्रिम रेतानातून जन्माला येणारे वासरू नर जातीचे असेल की मादी याची खात्री नसल्याने जे काय जन्माला येईल त्यावर समाधान मानून घ्यावे लागत असे.

अनेकवेळा शेतकर्‍यांचा भ्रमनिरास होताना नर जातीचे वासरू जन्माला आल्यावर त्याच्या संगोपनाचा प्रश्‍न उपस्थित होऊन मग त्याला एकतर त्याचा दुधाच्या कमतरतेमुळे मृत्यू तरी होई किंवा जगलेच तर त्याला कत्तलखान्याचा रस्ता खुणावत असे. मात्र, कालवड जन्माला आली तर तिचे संगोपन मोठ्या थाटात केले जात असे आणि तसे ते आजही केले जाते. कारण पुढे तीच तर दूध देणारी ‘धनश्री’ बनणार असते.

कृत्रिमरित्या मादीच जन्माला घालण्याची पद्धत यापूर्वी पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासूनच वापरात होती. जैविकरीत्या बैलाच्या रेतनावर प्रक्रिया करून एक्स गुणसूत्र वापरून जवळपास 90 टक्क्यांपर्यंत मादी जातीचे वासरू जन्माला येण्याची या पद्धतीमुळे शक्यता वाढते. एक्स गुणसूत्र आणि वाय गुणसूत्रापासून जन्माला येणारे वासरू हे नर जातीचे असण्याची दाट शक्यता असते तर दोनही एक्स गुणसुत्रापासून जन्माला येणारे वासरू हे मादी जातीचे जन्माला येते. हे गुणसुत्रांचे नमुने 0.25 ओ.5 मिली व्हायलमध्ये साठवून ठेवले जाते आणि त्यानंतर ते गायीच्या गर्भपिशवीत सोडून होणार्‍या वासराची प्रतीक्षा करावी लागते.

या प्रक्रियेद्वारे गायींना होणारे वासरू हे मादी जातीचे जन्माला येण्याचे प्रमाण वेगवेगळ्या तज्ञांच्या मते वेगवेगळे येते.काहींच्या मते हे प्रमाण 70/30 तर काहींच्या मते 60/40 असे आहे.परंतु यावर वेगेवगळ्या प्रतिक्रिया जरी मिळत असल्या तरी शेतकर्‍यांच्या मात्र आशा यामुळे वाढल्या आहेत.मुख्यत्वे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी आणि नागरिकांपर्यंत सकस आणि शुद्ध दूध पोहोचावे असा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाला जोर दिला आहे.