Wed, Jan 22, 2020 13:06होमपेज › Ahamadnagar › १३३ गावांत होणार नवीन स्वस्त धान्य दुकाने

१३३ गावांत होणार नवीन स्वस्त धान्य दुकाने

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 10 2018 12:01AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 133 महसुली गावांत नवीन स्वस्तधान्यांची दुकाने सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. पारनेर तालुक्यांत सर्वाधिक 23 तर नगर शहरात दोन नवीन दुकाने थाटली जाणार आहेत. 

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व  लोकसंख्या वाढ आदी विविध  कारणामुळे नवीन स्वस्तधान्य तसेच किरकोळ केरोसीन दुकाने सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार येत्या काही महिन्यात जिल्हाभरात आणखी 133 नव्या दुकानांची भर पडणार आहे.

नगर शहरात बुरुडगल्‍ली, भिंगारमधील ब्राम्हणगल्‍ली, नगर तालुक्यातील सांडवे, कोळपेआखाडा, उदरमल, वाळकी व पारगाव मौला आदी गावांत नवीन स्वस्तधान्य दुकाने सुरु होणार आहेत.  शेवगाव तालुक्यात 5,  श्रीगोंदा तालुक्यात 7, कर्जत तालुक्यात 2, जामखेड तालुक्यात 2, पारनेर तालुक्यात 23, नेवासा तालुक्यात 13, संगमनेर तालुक्यात 8, राहुरी तालुक्यात 12, श्रीरामपूर तालुक्यात 11, कोपरगाव  तालुक्यात 8, अकोले तालुक्यात 23, राहाता 5 व पाथर्डी 7  अशी एकूण 133  महसूली गावांत नवीन रास्तभाव दुकाने सुरु  केली जाणार आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने गावागावांतील नोंदणीकृत  स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था,  अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या  अंतर्गत नोंदणी  झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता  बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांकडून 4 जून 2018 पर्यंत अर्ज मागविले आहेत. 

जिल्ह्यात आजतागायत एकूण 1 हजार 886 स्वस्तधान्ये दुकाने कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून स्वस्तधान्य दुकानांतील गहू, तांदूळ व रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी  तसेच योग्य लाभार्थ्यांनाच धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने धान्य वितरणासाठी  पॉस मशीन उपलब्ध केले. सर्वच दुकानांतून पॉस मशीनव्दारे धान्य वितरित केले जात आहे. दहा टक्के दुकानांत मात्र धान्य वितरण करताना अडचण येत आहे.