Sun, Mar 24, 2019 12:41होमपेज › Ahamadnagar › गडाचा ‘वॉचमन’ म्हणून जबाबदारी पार पाडणार

गडाचा ‘वॉचमन’ म्हणून जबाबदारी पार पाडणार

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 03 2017 10:58PM

बुकमार्क करा

करंजी : वार्ताहर

राष्ट्रसंत भगवानबाबा सर्व धर्मियांचे श्रदधास्थान होते. त्यामुळे त्यांच्या नावाने पार पडलेल्या ऐंशी हरिणाम सप्ताहांपैकी चाळीस सप्ताहांचे नियोजन मराठा समाजाने केले. सर्व धार्मियांना सोबत घेण्याच काम भगवानबाबांनी सातत्याने केले. गडाच्या संपत्तीवर काहींचा डोळा आहे. मात्र, मी गडाचा ‘वॉचमेन’ म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे, असे प्रतिपादन महंत नामवदेव शास्त्री यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे नव्याने उभारलेल्या मंदिरामध्ये श्री विठ्ठलाच्या मूर्तीसह राष्ट्रसंत भगवानबाबा, वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नामदेव शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते भाविकांसमोर बोलत होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमानिमित्त डमाळवाडी येथे आलेल्या शास्त्री महाराजांचे ग्रामस्थांनी घरासमोर गुढी उभारुन सडा-रांगोळ्या काढत, टाळ मृदूंगाच्या जयघोषात जोरदार स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरूष उपस्थित होते. 

शास्त्री म्हणाले, राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी अविरत दु:ख, त्रास सहन केला. मात्र ते आयुष्यभर संतवाचारानेच मार्गक्रमण करीत राहिले. भगवान गडाची स्थापना वयाच्या 53 व्या वर्षी बाबांनी केली. गडावर जवळपास बारा वर्षे बाबा राहिले. भगवान गडाचे काम अर्धवट ठेवून त्यांनी वामनभाऊंना गड पूर्ण करण्यासाठी मदत केली. आळंदीत ज्ञानेश्‍वरांच्या नावाने, देहुत तुकाराम महाराजांच्या नावाने तर पैठण एकनाथांच्या नावाने ओळखले जाते.

मग भगवानगडदेखील केवळ भगवानबाबांच्याच नावाने ओळखला जावा. इतर कोणाच्याही नावाणे नव्हे. भगवानबाबांचा मठ सोडून इतर मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीवर काहींचा डोळा आहे. म्हणून भाषणबंदीच्या नावाखाली ओरड केली जात आहे. भाषण बंदीनंतर गडावर अनेक जातीधर्माचे लोक येऊ लागले असून येणार्‍यांची गर्दी वाढली आहे. बाबा आणि गडाचा इतिहास व काही गोष्टी तरूणांना माहित नाहीत. त्यामुळे त्यांचा अनेकवेळा गैरसमज होतो, असे शास्त्री यावेळी म्हणाले. राष्ट्रसंत भगवानबाबा गड हा सर्वांचा आहे. येथील साधनसंपत्ती गडाची म्हणजे जनतेचीच आहे. तेथे वॉचमेनची भूमिका मी बजावतोय. त्यामुळे तेथील वाटी घेतली तरी मला राग येतो. कोणी वाटा मागीतला तर... अशा शब्दात नामदेव शास्त्री यांनी भावना व्यक्त केल्या. 

यावेळी हरेश्‍वर देवस्थानचे महंत भगवान महाराज मचे, संतोष महाराज गीते, निळकंठ आव्हाड, उपसरपंच आंबादास डमाळे, विक्रम डमाळे, अंबादास शिरसाठ, ठकाजी डमाळे, गोरख डमाळे, गणेश पोटे, भानुदास डमाळे, आदिनाथ पोटे, सुरेश सानप, गोपिनाथ शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.