Wed, Jul 24, 2019 15:10होमपेज › Ahamadnagar › नव्या वर्षात ‘नवा गडी, नवा डाव’ 

नव्या वर्षात ‘नवा गडी, नवा डाव’ 

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 11:34PM

बुकमार्क करा

श्रीरामपूर :  प्रतिनिधी

नवीन वर्ष हे नवीन काहीतरी नक्की घेवून येणार असतं. त्यामुळे निश्‍चितच हे नवीन वर्षही आगामी 2019 चे वेध घेणारं असल्याने राजकीय सारिपाटावर वेगवेगळ्या डावपेचांना यंदाच वेग येणार आहे. यातून राहुरीच्या राजकारणातही नेहमीच्या हवेत बदल होणार असल्याचे संकेत सर्वच पक्षांतील अंतर्गत घडामोडीवरून लक्षात येत आहे. विशेष म्हणजे, या नवीन वर्षात काही नवीन चेहरेही राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय ठरणार आहे. राहुरी विधानसभा मतदार संघातील सर्वच पक्षात ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशीच काही अवस्था आहे. येथे दोन पंचवार्षिकपासून भाजपाची सत्ता आहे.

विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांनी माजी आ. चंद्रशेखर कदम यांच्या बोटाला धरून भाजपात प्रवेश मिळवत आमदारकी मिळवली होती. त्यातच त्यांनी उद्याचे आडाखे बांधून आपले राजकीय वारसदार अक्षय कर्डिले यांना राहुरीत सक्रिय केलेले आहेचं. अक्षय कर्डिलेंनी नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भागडा चारीची कळ दाबून राजकीय कारर्कीदीच्या पायाभरणीला सुरुवात केलेली आहे.  मात्र काही दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे राहुरीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.  गेल्या काही निवडणुकांमध्ये आ. कर्डिले व ना. विखे यांच्यातील राजकीय सोयरीक त्यांना फारशी रुचलेली नाही, तसे त्यांनी जाहीर सभेतून अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे. त्यामुळेच की काय त्यांनी माजी आमदार कदम यांना शिर्डी संस्थानवर पाठवत त्यांचे चिरंजीव सत्यजित कदम यांनाही ताकद दिली आहे.

नगरपालिका निवडणुकीत ना. शिंदे यांनी देवळालीत तळ ठोकून सत्यजित कदमांची जबाबदारी स्वीकारल्याचे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. याशिवाय ‘संघाची’ पाटी असलेले माजी आ. कदम यांचा पूर्वीचा गटही काही दिवसांपासून सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहे. यात सध्याचे कमिट्या, पदे न मिळालेल्या नाराजांचाही समावेश लक्षवेधी असल्याने या हालचाली खूप काही सांगणार्‍या आहेत. त्यातुन अनपेक्षितपणे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना विधानसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी छुपे हात आतापासूनच कामाला लागल्याचे  ऐकायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसला संजीवनी देताना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे. माजी खा. प्रसाद तनपुरे तसेच आई डॉ. उषाताई तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रसाद शुगरच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांशी जवळीक साधली तर नगरपालिकेतून त्यांनी राहुरीकरांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याचवेळी जि. प. सदस्य शिवाजीराजे गाडे यांनीही उद्याचे समीकरणे ओळखून विधानसभेची आतापासूनच जुळवा जुळव करून ठेवली आहे. अर्थात नागपूर अधिवेशनाप्रसंगी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या हाताला धरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्या नजरेत भरणारे काम केल्याचे दाखवून दिले आहे. जर राष्ट्रवादीकडून डावललेच, तर गाडेंनी पर्यायी पक्ष म्हणून आतापासूनच राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांच्याशी जुळवून घेतले आहे.

काँग्रेसमध्ये गेल्यावर्षी ऐनवेळी अमोल जाधव यांनी उमेदवारी केली होती. मात्र यावेळी राष्ट्रवादीशी आघाडी न झाल्यास येथे तालुक्याचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील हेच काँग्रेसचे दावेदार असणार आहेत. वांबोरी येथील जि. प. निवडणूक प्रचार सभेत ना. विखे यांनी यापूर्वीच तसे संकेत दिलेले आहेत. दुसरीकडे, शिवसेनेची भाजपाशी काडीमोड लक्षात घेवून येथे स्वतः जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दंड थोपटले आहेत. राहुरीत गाव तेथे शिवसेना स्थापन करून त्यांनी राहुरीत पकड मिळवली आहे. तसेच आ. कर्डिलेंच्या बालेकिल्ल्यात प्रा. शशिकांत गाडे यांनी खिंडार पाडल्याने घाटावरती चढाई करणे खेवरेंना सोयीचे ठरणार आहे. मात्र बेरजेत तरबेज असलेल्या खेवरेंना मतविभाजनाच्या खेळीचा वर्षभरात बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे.सन 2018 हे वर्ष खरतरं 2019 ची पूर्वतयारी करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. या वर्षाच्या अखेरीस आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणीला प्रचंड वेग येणार आहे. त्या पार्श्‍वभूमिवर राहुरीत प्राजक्त तनपुरे, सत्यजित कदम, अक्षय कर्डिले, उदयसिंह पाटील या नवयुवकांना हे वर्ष राजकीय चुणूक दाखवण्यासाठी अनुकुल आहे तर रावसाहेब खेवरे, शिवाजीराजे गाडे या मात्तबरांसाठी हे वर्ष राजकीय सारीपाटावर सोंगट्या फेकण्याचे असणार आहे.