Thu, Apr 25, 2019 23:49होमपेज › Ahamadnagar › भगव्याला त्रास देणार्‍यांचा नाश : प्रज्ञासिंह

भगव्याला त्रास देणार्‍यांचा नाश : प्रज्ञासिंह

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMनेवासा/शनि शिंगणापूर : प्रतिनिधी 

राष्ट्रभक्तीपासून दूर जाणारे आंतकवादाने मरतील. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले जीवन अर्पण असून राम मंदिर होणारच आहे असा ठाम विश्‍वासत व्यक्त करत भगव्याला त्रास देणार्‍यांचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. सोमवारी रात्री तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे जाऊन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी सकाळी शनी शिंगणापूर येथील देवस्थानच्या होमकुंड येथे शनि अभिषेक केला. यावेळी त्यांच्यासमवेत अ‍ॅड. सुनील चावरे, हेमंत त्रिवेदी, डॉ. विक्रम चोभे, डॉ. अनुपा चौभे, प्रभाकर अंजुरकर, भगवान झा यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

देवगड येथे साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, तप्त असलेल्या भगव्याला त्रास देणार्‍यांचा सर्वनाश होईल हे सत्य युगापासून सुरू आहे. महाराष्ट्र ही संत, राष्ट्रभक्तांची व शिवरायांची भूमी आहे. संत हे सहनशील असतात. पण संत वचन हे देवाची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या याच भूमीत संतांना आणून त्रास दिला गेला. त्यामुळे त्या राज्यकर्त्यांचा नाश झाला. राष्ट्रभक्ती, देवभक्ती ही देवांची हत्यारे मानव जातीच्या, श्रृष्टी व धर्म रक्षणासाठी वापरली जातात. समाजाने सुद्धा ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.

आपले सर्व जीवन राष्ट्रभक्तीसाठी व धमार्साठी अर्पण आहे. राम मंदिर निर्मितीसाठी आपण राहणार असून राम मंदिर होणारच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्ञानेश्वरी वाचताना माझ्या जीवनातील अनेक प्रश्‍न सुटण्यास मला मदत झाली. तर देवगड येथील रम्यभूमी मला पुन्हा येथे येण्यास भाग पडणार आहे. मंगळवारी सकाळी शनि अभिषेक केल्यानंतर शनि चौथर्‍यावर जाऊन शनि दर्शन घेतले. शनिदेवाला तेल अर्पण केले. यावेळी देवस्थानाच्यावतीने जनसंपर्क कार्यालयात अध्यक्षा अनिता शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनि प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी शालिनी लांडे, आदिनाथ शेटे उपस्थित होते.