Thu, Aug 22, 2019 11:08होमपेज › Ahamadnagar › संशयितच निघाले दिगंबरचे मारेकरी!

संशयितच निघाले दिगंबरचे मारेकरी!

Published On: Feb 28 2018 1:19AM | Last Updated: Feb 28 2018 12:07AMनेवासा : प्रतिनिधी 

नेवासा तालुक्यातील वरखेड येथे सोमवारी मृतावस्थेत सापडलेल्या दिगंबर गोरेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. जमिनीला अडसर ठरणार्‍या दिगंबर गोरेचा एका महिलेसह दोघांनी खून केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्याने नेवासा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेत आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने 5 मार्चपर्यंत दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्यांनीच गोरेचा काटा काढला असून नेवासा पोलिसांनी काही वेळातच या खूनाचा छडा लावला आहे. मैनाबाई पोपट गंगुले (वय 58) व तिचा भाचा गंगाधर भागाजी कुंढारे (वय 43, दोघे रा. वरखेड ता. नेवासा) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याबाबत मयत दिगंबर मारूती गोरे याचा भाऊ आबासाहेब गोरे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, तालुक्यातील वरखेड येथील मैनाबाई गंगुले हिच्याकडे अनेक वर्षंपासून माझा भाऊ दिगंबर राहत होता. 
तसेच मैनाबाईचा भाचा गंगाधर हा देखील काही दिवसांपासून मैनाबाईकडे रहात आहे. वरखेड परिसरात सध्या एका साखर कारखान्याचे काम चालू आहे. या भागातच  मैनाबाईची दोन एकर जमीन रस्त्यालगत आहे. जमिनीला मोठा भाव आहे. 

या जमिनीवरून दिगंबर व मैनाबाईचे सतत वाद होत होते. दिगंबर या जमिनीमध्ये अडसर ठरू लागल्यानेच मैनाबाई व तिचा भाचा गंगाधर कुंढारे यांनी 25 तारखेला  त्याचा कशाने तरी गळा आवळून खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे. नेवासा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या मैनाबाई व तिचा भाचा गंगाधर या दोघांविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. यामध्ये आणखी साथीदार असल्याची पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी व्यक्त केली आहे.