Sun, Mar 24, 2019 08:40होमपेज › Ahamadnagar › ‘नेहरु मार्केट’ अतिक्रमणांच्या विळख्यात!

‘नेहरु मार्केट’ अतिक्रमणांच्या विळख्यात!

Published On: Jun 17 2018 1:34AM | Last Updated: Jun 16 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

चितळे रस्त्यावरील नेहरु मार्केटच्या जागेवर भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्याचे महापालिकेचे सर्व प्रयत्न राजकीय कुरघोड्यांमुळे फोल ठरले आहेत. शासनाने याबाबतचे ठराव विखंडीत केल्यानंतर आजतागायत या मार्केटच्या उभारणीचा महापालिकेला विसर पडला आहे. परिणामी, अनेकांनी बेकायदेशीपणे जागा बळकावून व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेते रस्त्यावरच बसत असल्याने नागरिकांना मात्र दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या जागेला कंपाऊंड उभारुन भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या भाजी विक्रेता संघटनेच्या मागणीकडेही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

नेहरु मार्केट विकसित करण्याच्या नावाखाली कुठलीही गरज नसतांना आणि पुनर्उभारणीसाठी त्यावेळी मनपाकडे निधीची उपलब्धता नसतांनाही भाजी मंडईची भव्य वास्तू उध्वस्त करण्यात आली. नवीन भाजी मंडईसह व्यापारी संकुलाची स्वप्ने दाखविली गेली. मात्र, 7-8 वर्षात सदरची जागा विकसित करण्यासाठी अनेकवेळा ठराव होऊन, निविदा प्रक्रिया होऊनही हा नेहरु मार्केट उभारणीचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. दीड वर्षांपूर्वी अनेक वेळा निविदा मागविल्यानंतर प्रतिसादही मिळाला. मात्र, ‘प्रीमियम’च्या रकमेवरून निर्माण झालेला वाद, त्यावर झालेले राजकारण या खेळात जागा विकसित करण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्यातच सर्वांनी धन्यता मानल्याने ही निविदाही शासनाने रद्द केली. त्यानंतर तत्कालीन आयुक्‍त दिलीप गावडे यांनी शासनाच्या निर्णयावर नवीन धोरण ठरविण्यासाठी महासभेकडे पाठविलेला प्रस्तावही अडगळीतच पडला आहे.

दुसरीकडे मार्केटचा मोकळा भूखंड बेवासर स्थितीत असल्याने अनेकांनी अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले आहेत. एक-दोन भाजीविक्रेते वगळता खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी या जागेवर कब्जा केला आहे. काही बड्या राजकीय धुरिणांनी सदरची जागा बळकाविण्यासाठी मनसुबे आखण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध असतांनाही त्यांच्यावर रस्त्यावरच व्यवसाय थाटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चितळेरोडवर दररोज वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भाजी विक्रेता संघटनेने काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देऊन या जागेतील अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली आहे. या जागेला संरक्षक भिंत उभारुन मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यानंतरही अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही. महापालिकेचा मोक्याच्या जागेवर असलेला कोट्यवधींचा भूखंड विकसित झाल्यास यातून मनपालाच आर्थिक फायदा होणार आहे. तसेच भाजी विक्रेत्यांना आत बसण्यास जागा मिळाल्यास रस्त्यावर होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही मार्गी लागण्याची शक्यता आहे. प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.