Sat, Mar 23, 2019 16:04होमपेज › Ahamadnagar › वृक्ष लागवडीकडे मनपाने फिरविली पाठ

वृक्ष लागवडीकडे मनपाने फिरविली पाठ

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 19 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

शहरातील प्रत्येक प्रभागात 600 वृक्षांची लागवड या निकषानुसार शहरात 60 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नगरविकास सचिवांनी दिले आहे. महापालिकेने वृक्ष लागवडीबाबत कोणतेही नियोजन केले नाही, ही बाब सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मागविलेल्या माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे.

नगरविकास खात्याच्या सचिवांनी नाशिक विभागीय आयुक्‍तांसमवेत दि.4 एप्रिल रोजी नाशिकला बैठक घेतली होती. प्रत्येक प्रभागात 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार शहरात 60 हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महापालिका आयुक्‍तांनी दि.20 एप्रिल पूर्वी सर्व प्रभाग अधिकार्‍यांची बैठक घेणे आवश्यक आहे. या बैठकीत लँड बँकची माहिती संकलित करून सादरीकरण करावे. या माहितीची पुस्तिका तयार करून वृक्षारोपणासाठी खड्डे, खत, माती आणि किटकनाशके घालून दि.30 एप्रिलपर्यंत वृक्ष लागवडीची तयारी पूर्ण करून ही माहिती शासनाच्या संगणक प्रणालीवर अपलोड करण्याचा कृती कार्यक्र म दिला. हरित सेना सदस्यांची नोंदणी करून व्यापक मोहीम राबविण्याचा आदेश देण्यात आला होता. 

उद्यान विभागाकडे माहिती अधिकारात वृक्ष लागवडीबाबत माहिती मागविण्यात आली. त्यामध्ये मनपा आयुक्‍तांनी कोणतीही बैठक घेतलेली नाही. वृक्ष लागवडीसाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्‍ती झालेली नाही. हरित सेनेची नोंदणी केलेली नाही. वृक्ष लागवडीसाठी तांत्रिकदृष्टया खड्डे घेतले नाहीत. महापालिका वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व नगरविकास सचिव विकास खारगे यांच्याकडे केली आहे.