होमपेज › Ahamadnagar › एकदिलाने पाणीप्रश्‍न सोडविणे गरजेचे

एकदिलाने पाणीप्रश्‍न सोडविणे गरजेचे

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 10:58PMकोपरगाव : महेश जोशी

कोपरगाव शहरवासियांना पिण्यासाठी असलेल्या येसगाव येथील चौथ्या साठवण तलावाचे काम आता प्राधान्याने होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांनी पाणी प्रश्‍न सोडवणुकीसाठी एकदिलाने विषय मंजूर करून नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे व सर्व सहकार्‍यांनी वर्षांनुवर्षे भिजत घोंगडे म्हणून पडलेल्या प्रश्‍नात आ. स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून तो सोडवून घेणे गरजेचे आहे.

पाटबंधारे विभाग नगरपालिकेकडून घरगुती व व्यापारी औद्योगिक तत्त्वावर पाणीपट्टी आकारते.  सध्याच्या चार साठवण तलावांत गाळ साठल्याने त्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे शहराला महिन्यातून सात ते आठ वेळा पाणीपुरवठा होऊ शकतो.  सध्या सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून चारही साठवण तलावांच्या मुखाजवळ मोठे मीटर असलेले संच बसविण्याचे काम सुरू आहे.  त्याद्वारे पाटबंधारे विभागाकडून साठवण तलावात किती पाणी येते, याची सर्व माहिती यातून मिळणार आहे व त्या प्रमाणावरच पाटबंधारे खात्यास पाण्याचे पैसे अदा करावे लागेल, असे मुख्याधिकारी दरेकर यांनी सांगितले.

नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी गावाच्या विकासासाठी तरी एक पाऊल मागे सरकून एकत्रितपणे पाणीप्रश्‍नाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत पाणीपुरवठा सभापती स्वप्निल निखाडे यांनी व्यक्त केले आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा समन्वय साधावा. नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था जनतेच्या विकासाची आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी ही दोन या विकासरथाची चाके आहेत. त्यासाठी गावगाडा एकत्रितपणे हाकणे जरुरीचे आहे.

तत्कालिन नगराध्यक्ष ऐश्‍वर्या सातभाई यांच्या कार्यकाळात मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या समवेत अडीच वर्षे काम केले. त्यावेळी कुठलाही अडसर आला नाही.  तेंव्हा वहाडणे यांनी आता तरी जुळवून शहरहिताचे काम करावे, असा सल्ला माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी एका बैठकीत दिला होता.

आजमितीस नगर-मनमाड रस्त्यालगत शहरानजिक असलेल्या शंकर जलाशयाची जागा जिल्हा परिषदेची आहे. मात्र, ती नगरपालिका वापरत आहे. सध्या जुनी पाण्याची टाकी पाडून तेथे नव्याने दोन टाक्या उभारल्या आहेत.  अत्याधुनिक पद्धतीने 42 कोटी रुपये खर्चून शहरात नव्याने जलवाहिन्या व विविध कामे सुरू आहेत. त्याची कामे साठ ते सत्तर टक्के झाली आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शहरात मीटरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. हे कामही अद्यापि पूर्ण झाली नाहीत.  

नागरिकांनी काही प्रभागांत पाण्याचे मीटर बसविले, पण काही ठिकाणी त्यास मीटर जास्त पळते म्हणून विरोध होत आहे. मुख्य जलवाहिनीवरील चोवीस तास चालणारे नळजोड कायमस्वरूपी बंद करावे सर्वांना एकाच पद्धतींने पाणीवाटप व्हावे. कोपरगाव बेट भागानजिक असलेल्या प्रयागाबाई रुईकर जलकुंभाजवळ जाण्यासाठी जागा नव्हती. तेथे काटेरी बाभळी होत्या. पालिका कर्मचार्‍यांकडून साफसफाई करून या प्रश्‍नांतही लक्ष घातले.  लक्ष्मीनगर प्रभागातील पाण्याच्या टाकीला लागलेली गळती दोन वेळा दुरूस्त करूनही ती थांबण्यास तयार नाही. त्यामुळे ही टाकी जमीनदोस्त केल्याशिवाय उपयोग नाही, असेही मुख्याधिकारी दरेकर यांनी सांगितले.