होमपेज › Ahamadnagar › पोलिसांची कायम नेमणूक करावी

पोलिसांची कायम नेमणूक करावी

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 02 2018 11:53PMवाळकी : वार्ताहर

नगर तालुक्यातील वाळकी येथे तालुका पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस दूरक्षेत्र आहे. या दुरक्षेत्रांतर्गत येणार्‍या परिसरातील 18 गावांतील नागरिकांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या 4 पोलिसांवर आहे. मात्र या ठिकाणी नियुक्तीस असलेले पोलिस कर्मचारी गेल्या पंधरा वर्षांपासून वास्तव्य करत नसल्याने दूरक्षेत्राची इमारत पोलिसांअभावी धुळखात पडून आहे. 

या ठिकाणी कायम कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असून अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने दूरक्षेत्रात कायमस्वरूपी पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे .

वाळकी हे तालुक्यात राजकीय दृष्टीने महत्वाचे अन् बाजारपेठेचे गाव आहे. वर्दळीचे ठिकाण असल्याने या परिसरात अवैध व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला आवर घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. दूरक्षेत्रासमोरील विद्यालयात परिसरातील मुले, मुली मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. विद्यालयासमोरील बसस्थानकावर टारगट मुलांचा वाढता राबता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे. या ठिकाणी तरुणांच्या हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत.

येथील पोलीस दुरक्षेत्रांतर्गत वाळकीसह देऊळगाव सिद्धी, राळेगण, गुंडेगाव, वडगाव तांदळी, पारगाव मौला, वाळूंज, बाबुर्डी घुमट, सारोळा, घोसपुरी, खडकी, हिवरे झरे, बाबुर्डी बेंद आदी अठरा गावे आहेत. कर्मचार्‍यांअभावी अभावी दारु अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत व पोलिस दूरक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी पोलिस नेमण्याची अनेक वेळा करूनही पोलिस प्रशासन मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.

ग्रामपंचायतीच्या मागणीकडेही दुर्लक्ष : बोठे

वाळकी परिसरात लहान-मोठ्या चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. येथील चौकीत पोलिस उपस्थित रहात नसल्याने चोरीची फिर्याद देण्यासाठी ग्रामस्थांना नगरला जावे लागते. कायदा-सुव्यवस्थेचा राखण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे. ग्रामपंचायतीने येथील चौकीत कायमस्वरूपी पोलिस नियुक्ती करण्याची मागणी अनेक वेळा केली. मात्र याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असे वाळकीच्या सरपंच स्वाती बोठे यांनी सांगितले.