Thu, Apr 25, 2019 13:42होमपेज › Ahamadnagar › तहसीलदारांच्या खुर्चीला हार

तहसीलदारांच्या खुर्चीला हार

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:39AMकर्जत : प्रतिनिधी

तहसीलदार किरण सावंत हे सोमवारी आठवडे बाजाराचा दिवस असतानाही कार्यालयात नसल्याने गांधीगिरी म्हणून त्यांच्या खुर्चीला माजी सरपंच शिवाजीराव फाळके, शिवसेनेचे विभागप्रमुख पप्पू फाळके, सामाजिक कार्यकर्ते सतिश परदेशी यांनी हार घातला.

यावेळी शिवाजीराव फाळके म्हणाले की, सोमवारी कर्जतचा आठवडे बाजार असतो. या दिवशी तालुक्यातील शेतकरी, नागरिक, महिला, विद्यार्थी विविध शासकीय कामांसाठी कर्जत येथे येत असतात. अशावेळी तहसीलदारांनी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा तहसीलदार सोमवारी कार्यालयात नसल्याचे दिसून आले आहे. दुपारी जेवणासाठी ते दोन ते तीन सात निघून जातात. त्यामुळे नागरीकांच्या कामाचा खोळंबा होतो. सर्वांना ताटकळत बसावे लागते. कधी कधी काही कागदपत्रांवर तहसीलदारांच्या सह्या घेऊन दुसर्‍या कार्यालयांमध्ये काम करायचे असते. मात्र अधिकारी नसल्याने त्यांचे काम होत नाही. नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.

तहसीलदार हे तालुक्याचे दंडाधिकारी आहेत. त्यांच्यावर तालुक्यातील नागरिकांची जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. मनमानी करून कारभार करण्याची ती जागा नाही. जनतेची सतत अडवणूक होत असेल आणि कोणी पदाचा गैरवापर करीत असेल, तर ती बाब गंभीर आहे. आमच्याकडे यापूर्वी सावंत यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. ते कोठे आहेत, कोठे जातात याबाबत माहिती मिळण्याची कोणतीही व्यवस्था नाही.

त्यांचे दालन बंद पाहून नागरिक मुकाट्याने परत जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनीही याबबत गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. या पुढे अशा प्रकारे जनेतची अडवणूक होत राहिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा फाळके यांनी दिला आहे.दरम्यान, तहसीलदारांच्या खुर्चीस हार घातल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर पसरताच तो तालुक्यात जोरदार चर्चेचा विषय झाला.