Mon, Jun 24, 2019 17:32होमपेज › Ahamadnagar › दक्षिणेत तगडा उमेदवार देणार : खा. सुळे

दक्षिणेत तगडा उमेदवार देणार : खा. सुळे

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:02PMराहुरी : प्रतिनिधी 

नगर-दक्षिणेची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही. येथे तगडा उमेदवार दिला जाईल, असे आश्‍वासन खा. सुप्रिया सुळे यांनी दिले. राहुरी येथील हल्लाबोल आंदोलनावेळी खा. सुळे यांनी नगर दक्षिणेबाबत राष्ट्रवादीची भूमिका मांडून सध्या सुरू असलेल्या  चर्चेला पूर्णविराम दिला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आंदोलनावेळी येण्यास विलंब होत असल्याचे पाहत सभेची सर्व सूत्रे सुप्रियाताईंंनी हाती घेतली. उपस्थितांशी मनमुराद संवाद साधताना नगर दक्षिणेत खा. दिलीप गांधी यांच्या कामकाजाविषयी माहिती विचारली. याप्रसंगी काहींनी दक्षिणेचा खासदार दाखवा, हजार रुपये बक्षीस मिळवा, म्हणत राहुरीत केंद्राच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगितले. 

याप्रसंगी खा. सुळे यांनी तुम्ही आता राष्ट्रवादीचा खासदार निवडून द्या, बारामती व नगर काही वेगवेगळे नाही. दौंडचा पूल दोन्ही जिल्ह्यांत असून बारामतीपेक्षा 50 टक्के अधिक विकास कामे नगरमध्ये करू. नगर जिल्ह्यात विकासाचा डोंगर उभारण्याचे आश्‍वासन देत तुमच्या मनाप्रमाणे उमेदवार दक्षिणेत उभा करू, असे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांची चांगलीच मने जिंकली. 

दरम्यान, माजी मंत्री जयंत पाटील हे भाषण करीत असताना त्यांना खोकला आला. यावेळी व्यासपीठावर अनेकांची उपस्थिती होती. मात्र, खा. सुप्रियाताई यांनी हातात बाटली घेत ‘दादा पाणी घ्या’ असे सांगताच उपस्थितांनी खा. सुळे यांच्या साधेपणाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यानंतर सभेला विलंब होऊ लागल्याने विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट व्यासपीठावर आले आणि भाषणाला सुरुवात केली. मोटारसायकल रॅली संपवून मुंडे सभास्थळी आले, तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरू होते. त्यांचे भाषण संपताच उपस्थितांनी धनंजय मुंडे यांनी भाषण करावे, असा आग्रह धरला.

प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे पक्षशिस्तीत बसत नाही, असा निर्वाळा मुंडे यांनी दिला. मात्र. तरीही श्रोत्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी मुंडे यांना भाषण करण्याची परवानगी दिली. विराट कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग आता कोण पाहणार? असा मिश्किल सवाल मुंडे यांनी उपस्थित करताच अजित पवार यांनी मुंडे यांना कधी कधी हरभजन सिंगसुद्धा सामना जिंकून देतो. तू बिनधास्त बॅटींग कर, अशी परवानगी दिली.