होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली निदर्शने

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली निदर्शने

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:39PMनगर : प्रतिनिधी

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ व वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस टाकीवर लावलेले विविध कर त्वरित मागे घेऊन, त्यांच्या किमती कमी कराव्यात,  या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. 

महिला व सर्वसामान्य नागरिकांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंची सातत्याने भाववाढ होत आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस टाकीवर मोठा कर लावल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यांपेक्षा कमी झाल्या असताना पेट्रोलचे भाव निम्म्यावर येणे अपेक्षित आहे. परंतु सरकारने हे दर कमी केले नाहीत. परिणामी दिवसेंदिवस महागाई वाढू लागली आहे. या वाढत्या महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने काल (दि. 5) जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आले.  निदर्शनात  महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड पाटील, जि.प.सदस्या सुप्रिया झावरे, निर्मला मालपाणी, अ‍ॅड. शारदा लगड, चित्रा बडे, विद्या भोर, मायादेवी खरे, अर्चना जाधव, प्रतिभा शिलेदार, माधवी वाघचौरे, भारती शिंपी, राजवी नेहरे, प्रियंका आवारे आदींसह जिल्हाभरातील महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.