होमपेज › Ahamadnagar › नाशिक ते पंढरपूर ‘हायटेक’ सायकल वारी

नाशिक ते पंढरपूर ‘हायटेक’ सायकल वारी

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 11:49PMतळेगाव दिघे : वार्ताहर

नाशिक सायकलिस्टचे संस्थापक सदस्य व मुंबईचे पोलिस उपायुक्त हरीष बैजल यांच्या संकल्पनेतून यंदाही आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या नाशिक ते श्रीक्षेत्र पंढरपूर या हायटेक सायकल वारीद्वारे वृक्षारोपण, पर्यावरण बचाव संदेश दिला जात आहे. सुमारे पाचशेहून अधिक सायकलस्वार उत्साहात या वारीत सहभागी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडझरी येथे या सायकल वारीचे स्वागत करण्यात आले.

नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन व दातार कन्सर जेनेस्टिक्स लिमिटेड यांच्यातर्फे आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते श्रीक्षेत्र पंढरपूर हायटेक सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण आणि शून्य प्लास्टिक हा विषय घेऊन सातव्या वर्षीही सायकल वारी निघाली आहे. सौर ऊर्जेवर चालणारा सायकल रथ या वारीचे यंदाचे खास आकर्षण आहे. नाशिक, तळेगाव दिघे व नगरमार्गे ही सायकली वारी पंढरपूरकडे निघाली आहे. डोंबिवली येथील प्रसाद उटेकर हा दृष्टिहिन तरुण टँडम सायकलवर वारीत सहभागी झाला असून डॉ. मनीषा रौंदळ त्याच्यासमवेत आहेत. संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला, तळेगाव दिघे व वडझरी येथे सायकल वारीचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.या प्रसंगी मुंबईचे पोलिस उपायुक्त हरिष बैजल, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, सहायक वनसंरक्षक भगिरथ निमसे, विभागीय वनअधिकारी सिद्धी जमधडे, वनअधिकारी रक्टे, पं.स. सदस्य किरण मिंडे, सरपंच बाबासाहेब कांदळकर उपस्थित होते.