Sun, Jun 16, 2019 02:17होमपेज › Ahamadnagar › कोण होणार शिक्षक आमदार?

कोण होणार शिक्षक आमदार?

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:35PMनगर : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागात 92 टक्के मतदान झाले. मतदानानंतर चौथ्या दिवशी आज नाशिक येथे मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी विभागीय प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीतील सोळा उमेदवारांपैकी शिक्षक वर्ग कोणत्या उमेदवाराला आमदार करणार, याची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. मतदानासाठी पसंतीक्रम असल्याने मतमोजणी ची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांची सहा वर्षांची कारकीर्द 7 जुलै 2018 पर्यंत आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने या मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी घेतली आहे. हा मतदारसंघ नगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हयात विभागला गेला आहे. या निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) मतदान झाले.  एकूण 53 हजार 892 मतदारांपैकी 49 हजार 742 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजाविला. विभागात एकूण 92.30 टक्के मतदानाची नोंद झाली. 

नगर जिल्ह्यातील 12 हजार 383 मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत भाजपा या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार अनिकेत विजय पाटील तसेच अपक्ष म्हणून माजी खासदार प्रतापराव सोनवणे, संदीप बेडसे, सुनील पंडित, भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, अजितराव दिवटे, विठ्ठल पानसरे, बाबासाहेब गांगर्डे , रवींद्र पटेकर, अशोक पाटील, महादेव चव्हाण, किशोर दराडे, शालिग्राम भिरुड, मुख्तार कासीम व  विलास पाटील आदी अपक्ष उमेदवार नशीब अजामावित आहेत.

या निवडणुकीत भाजपाचे अनिकेत पाटील, प्रतापराव सोनवणे व संदीप बेडसे या तीन उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत असल्याचे दिसून आले आहे.या तीन उमेदवारांपैकी एक विजयी होणार की ऐनवेळी दुसराच कोणी बाजी मारणार याची मात्र उत्सुकता ताणली गेली आहे. या मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि.28) नाशिक येथील अंबड एमआयडीसी येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोशन येथे होणार आहे. विभागीय आयुक्‍त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने व निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयम यांच्या उपस्थित होणार आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.