Tue, Mar 26, 2019 22:38होमपेज › Ahamadnagar › नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ; उद्या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ; उद्या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:33PMनगर : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांनी शिक्षण क्षेत्रातील राजकीय वातावरण अधिक तापले गेले आहे. काल (दि. 23) अखेरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. सोमवारी (दि. 25) मतदान होणार आहे.

सभा, भेटीगाठी, बैठकांपुरता मर्यादित असलेला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सोशल मिडीयावरही दिसून आला. सोशल मिडीयावर या निवडणुकीचे धुमशान दिसून आले. मागील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळेस सोशल मिडिया प्रभावी नव्हता. त्याचप्रमाणे त्याचा वापर करणारेही कमी होते. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर  असून वापरकर्त्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने उमेदवारांनी सोशल मिडीयाचा आधार घेत जोरदार प्रचार केला. इतर वेळी सोशल मिडीयावर कधीही न दिसणारे आता अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे दिसून आले. उमेदवारांनी आपापल्या जवळच्या कार्यकर्त्यांना प्रचारासंबंधी मेसेज, फोटो, व्हिडीओ देऊन सोशल मिडीयावर प्रचार करण्यास सांगितले होते. तरुण गुरुजी मतदारांवर मोठा प्रभाव या नव्या माध्यमाचा पडत असल्याने सर्वांनीच या प्रचारात आघाडी घेतलेली दिसून आली. निवडणुकीत विजयी कोण होणार, कोणाला किती मते पडणार? याबाबतच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

काल शेवटच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासूनच उमेदवार मतदारांच्या भेटी गाठीसाठी बाहेर पडताना दिसले. मतदारांची झोप होण्याच्या आतच ‘तुम्हीच माझे माय- बाप’ असे म्हणत अनेक उमेदवारांनी अक्षरशः मतदारांचे पाय धरले. अखेरचा दिवस असल्याने मतदार राजाच्या घरी चहा-पाणी टाळून मतदानाचे आवाहन करून उमेदवार फिरत होते. त्यामुळे आज खर्‍या अर्थाने प्रचारात रंगत आल्याचे दिसून आली.

सद्ध्याच्या व यापूर्वीच्या आमदारांवर आरोप करत असतानाच मागील पाच वर्षात केलेली कामे, तसेच पुढील पाच वर्षातील शिक्षकांच्या प्रश्‍नांचे नियोजन आदींचा प्रभाव दिसून आला. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यात शिक्षक मतदारांना सदस्य बनवून आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवण्यात उमेदवार अंशतः यशस्वी झाल्याचे दिसले. फेसबुकवर आपल्या उमेदवाराचे छायाचित्र अपलोड करुन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. इच्छुक उमेदवाराने केलेल्या कामाची माहिती, वैयक्तिक माहिती तसेच त्यांचा अजेंडा फेसबुकवर अपलोड करण्यात आला.