Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › लोकसभेची रंगीत तालीम!

लोकसभेची रंगीत तालीम!

Published On: Jun 17 2018 1:34AM | Last Updated: Jun 16 2018 11:45PMनगर : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा या एकमेव राष्ट्रीय पक्षाने उमेदवार उभा केला आहे. माजी खासदार प्रताप सोनवणे यांना डावलून भाजपाने काँग्रेसचे एकेकाळचे वजनदार नेते व माजी केद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रताप सोनवणे यांच्यासह 16 जण आपले राजकीय भवितव्य अजमावून  पाहात आहेत. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांची मुदत 7 जुलै 2018 रोजी संपत आहे. त्यामुळे  या मतदारसंघाच्या निवडणूक 25 जून 2018 रोजी होत आहे. आ. हिरे यांनी मात्र दुसर्‍यांदा राजकीय नशीब अजमविण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा माजी खासदार सोनवणे यांना होती. परंतु त्यांना डावले गेल्याने त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेत, अपक्ष म्हणून उमेदवारी ठेवली आहे. सोनवणे यांनी भाजपाच्या वतीने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व केलेलेे आहे. 2009 मध्ये भाजपाच्या तिकीटावर ते धुळे मतदारसंघातून लोकसभेवर निवडणून गेले होते.

कै. इंदिरा गांधी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दळणवळण राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील यांना भाजपाने जवळ केले आहे. या निवडणुकीत भाजपा या एकमेव राष्ट्रीय पक्षानेच उमेदवार दिला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट व इतर राष्ट्रीय पक्षांनी मात्र उमेदवार उभा केला नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अजित लाठर यांना उमेदवारी दिली होती. परंतु या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे या पक्षाने अपक्ष उमेदवार संदीप बेडसे यांना पाठींबा दिला आहे.हा मतदारसंघ नगरसह नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यात विभागला गेला आहे. या जिल्ह्यांतील जवळपास 55 हजार शिक्षक मतदार आहेत. 

लोकसभेची निवडणूक आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने सुरु झाली आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतील अस्तित्व कायम ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची धडपड सुरु झाली आहे. मतदारसंघतील बहुतांश  शिक्षण संस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या ताब्यात आहेत.  त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक ही लोकसभेची रंगीत तालीमच असणार आहे.