Tue, Mar 26, 2019 08:26होमपेज › Ahamadnagar › नान्नजला वैद्यकीय अधिकारी नियुक्त

नान्नजला वैद्यकीय अधिकारी नियुक्त

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:44AMनान्नज : वार्ताहर

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैघकीय अधिकारी, चार आरोग्य सेविका, दोन शिपाई , एक स्वच्छता कर्मचारी अशी एकुण आठ पदे रिक्त असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची वाणवा तर औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्रच  सलाईनवर असून, रूग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत ‘पुढारी’ने ‘नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  
नान्नज येथे कोट्यावधी रुपये खर्चून  दोन वर्षांपूर्वी  नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवास भवन उभारण्यात आले.  

जामखेड  तालुक्यातील 83 हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी गेल्या अनेक वषार्ंपासून नान्नज प्राथमिक केंद्रावर आहे. जामखेड शहराचे नगरपरिषदेत रूपांतर होऊन अडिच वर्षाचा कलावधी उलटला. तरीही या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण अद्याप कमी झालेला नाही. नान्नज प्राथमिक आरोग्य  केंद्राकरिता  दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर आहेत. मात्र नेहमीच येथे एकच वैद्यकीय अधिकारी हजर असतो. एक जागा नेहमीच रिक्त असते. डॉ. एम. डी. शिंदे यांची बदली होऊन सहा महिने लोटले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. बारवकर हे 83 हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी एकटेच सांभाळत होते.

नान्नज प्राथमिक आरोग्य केद्रांत दोन आरोग्य सेविका यांची पदे रिक्त आहेत तर नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राजुरी व चुंबळी या दोन उपकेंद्रात प्रत्येकी एक आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. दोन शिपाई व एक स्वच्छता कर्मचारी अशी आठ पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बाबत ‘पुढारी’ने ‘नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर आरोग्य विभागाने कापरे व नेहे या दोन महिला  वैद्यकीय अधिकार्‍यांची 1 फेब्रुवारी रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती केली आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘पुढारी’चे अभिनंदन केले असून उर्वरित कर्मचार्‍यांची देखील नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.