Fri, Aug 23, 2019 14:44होमपेज › Ahamadnagar › ‘स्मार्ट ग्राम’चा निधी पडून!

‘स्मार्ट ग्राम’चा निधी पडून!

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 25 2017 10:15PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 14 गावांची स्मार्ट ग्राम स्पर्धेत निवड करण्यात आली होती. या गावांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात आला. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या दोन गावांसाठी 40 लाखाचा निधी देण्यात आला . निधी मिळाला  मात्र हा निधी कोणत्या विकासकामांवर खर्च करायचा याबाबत राज्य सरकारकडून निर्देशच न मिळाल्याने तब्बल दीड कोटींचा निधी खितपत पडून आहे.

जिल्ह्यातील 14 गावांचा स्मार्ट ग्राम म्हणून विकास करण्यात येणार आहेत. शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधून प्रत्येकी 1 अशा 14 गावांची तालुकास्तरीय समितीने निवड केली. या 14 गावांना 1 कोटी 40 लाखांतून प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात आला.  निवड झालेल्या गावाचा गौरव करण्यात आला होता. त्याचे प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

राज्यातील गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. त्या पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करून शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली आहे.या योजनेसाठी 5 हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी/ पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी करून ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर, असे गुणांकन झाले.

जिल्ह्यातील 773 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. त्यातून 14 ग्रामपंचायतींची निवड झाली .गेल्या 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांनी या ग्रामपंचायतींना पुरस्काराच्या रकमेचे धनादेश दिले. याला चार महिने उलटले तरीही खर्चाचे निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे प्राप्त निधी कसा खर्च करायच्या याच्या विवंचनेत ग्रामपंचायती आहेत.