Thu, Nov 15, 2018 23:06होमपेज › Ahamadnagar › कोपर्डी निर्भयाकांडातील आरोपींवर हल्‍ला करणार्‍या चौघांना ५ वर्षे सक्‍तमजुरी

कोपर्डी निर्भयाकांड: आरोपींवर हल्‍ला करणाऱ्यांना सक्‍तमजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कोपर्डी निर्भयाकांडातील आरोपींवर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करून पोलिसांना जखमी करणार्‍या चौघांना न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले होते. आज या चौघांना  ५ वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. 

दोषी ठरविलेल्या आरोपींमध्ये अमोल सुखदेव खुणे ( वय 25), गणेश परमेश्‍वर खुणे (28, दोघे रा. रुई धानोरा, ता. गेवराई, जि. बीड), बाबुराव वामन वाळेकर (30), राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील (21, दोघे रा. अंकुशनगर, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर झालेल्‍या सुनावणीत या चौघांना ही शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

दि. 1 एप्रिल 2017 रोजी कोपर्डी खटल्याची नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होती. या दिवशीच्या सुनावणीनंतर तत्कालीन न्या. सुवर्णा केवले यांनी पुढील सुनावणी दि. 17 एप्रिल रोजी ठेवली. त्यामुळे आरोपींना घेऊन पोलिस कर्मचारी न्यायालय आवारातून पोलिस वाहनाकडे चालले होते. त्यावेळी हातात सत्तूर व इतर घातक शस्त्रे घेऊन शिवबा संघटनेचे चारजण कोपर्डीतील आरोपींच्या दिशेने धावले. परंतु, पोलिस कर्मचारी मदतीला धावून गेले व त्यांनी शिवबा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना पकडले. या झटापटीत पोलिस कर्मचारी रवींद्र टकले हे जखमी झाले होते. याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार विक्रम भारती यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान 307, 353, 120 ब, 332, 34, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला. गुन्ह्यात ‘अ‍ॅस्ट्रॉसिटी’चे कलम वाढविण्यात आले. त्यानंतर तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. न्या. नावंदर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. दिवाणे म्हणाले की, आरोपींनी न्यायालयाच्या आवारात केलेले कृत्य घातक स्वरुपाचे आहे. खुनी हल्ल्याचा सर्व घटनाक्रम न्यायालयातील ‘सीसीटीव्ही’ फूटेजमध्ये कैद झालेला आहे. आरोपींविरुद्ध सबळ पुरावा आहे. त्यामुळे चौघांनाही दोषी धरण्यात यावे.

न्यायालयाने मंगळवारी (दि. 27) सायंकाळी सर्व आरोपींना खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकास दुखापत, सरकारी कामात अडथळा आणणे, गुन्ह्याचा कट रचणे आदी कलमाखाली दोषी ठरविले. भारतीय हत्यार कायदा व अ‍ॅस्ट्रॉसिटीच्या आरोपातून आरोपींची मुक्तता केली. आरोपींच्या शिक्षेवर आज बुधवारी (दि. 28) रोजी सुनावणी झाली. यामध्ये या चौघांना पाच वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Tags : Nager, koperdi, four people, attack, accused, case, four against, 5 years, rigorous imprisonment,


  •