Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Ahamadnagar › अपघातात नगरचे दाम्पत्य ठार

अपघातात नगरचे दाम्पत्य ठार

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:33AMपारनेर : प्रतिनिधी    

क्रेटा कार व एस. टी. बस यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील शहा दाम्पत्य जागीच ठार झाले. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावर माळकूप शिवारात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. 

पंकज इंद्रचंद्र शहा (50) व रुपाली पंकज शहा (48, रा. नवजीवन कॉलनी, नगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर पंकज शहा यांचा मुलगा करण याचा मित्र अमन नरेंद्र जैन (24) हा गंभीर जखमी झाला. गेवराई-भिवंडी एसटी बस (क्र.एमएच 20 बीएल 3066) नगरकडून कल्याणला जात होती. तर के्रटा कार (क्र.एमएच 16 बीएच 7743) कल्याणकडून नगरच्या दिशेने येत होती. माळकूप शिवारात त्यांच्यात धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्या, परंतु त्या शहा दाम्पत्यास वाचवू शकल्या नाहीत. कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्‍काचूर झाल्याने ती चालवित असलेल्या पंकज शहा यांच्या कमरेखालचा भाग कारमध्ये अडकला होता. 

अपघातानंतर आजूबाजूचे लोक मदतीस धावून आले. अमन जैन व रूपाली शहा यांना बाहेर काढून भाळवणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पंकज यांना कारबाहेर काढण्यासाठी नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ट्रॅक्टरच्या साहाय्याने कारचा चेमटलेला पत्रा ओढून पंकज शहा यांचा मृतदेह सुमारे एक तासाने बाहेर काढण्यात आला. पंकज यांची छाती, पोट तसेच कमरेखालीच्या भागास गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यांच्या पत्नीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. तर अमन जैन याचे दोन्ही पाय व एका हातास जखमा असून,  त्याच्यावर नगर येथील आनंदॠषी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, दोन्ही वाहने एकमेकांवर आदळल्यानंतर एसटीमधील चार ते पाच प्रवासीही किरकोळ जखमी झाले. त्यांनाही 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर एसटी बस रस्त्यावर आडवी झाल्याने सुमारे दीड तास या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. कारमधील मृतदेह बाहेर काढल्यानंतर के्रनच्या मदतीने बस रस्त्यावरून दूर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एसटीचा चालक दुसर्‍या वाहनास ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या केे्रटा कारला जोराची धडक बसली. विशेष म्हणजे दोन्हीही वाहनचालकांनी बे्रेक लावले नसल्याचे घटनास्थळाची पाहणी करताना दिसून आले. पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे, अण्णा चव्हाण, भालचंद्र दिवटे, महंमद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. भाळवणीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पारख, सुलतान तांबोळी, संतोष रोहोकले, अमोल सालके, अक्षय कदम यांच्यासह प्रवाशांनी पोलिसांना मोलाची मदत केली.