Wed, Apr 24, 2019 07:39होमपेज › Ahamadnagar › नगरचा ‘मावा’ ७ जिल्ह्यात

नगरचा ‘मावा’ ७ जिल्ह्यात

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

राज्यात मावा बंदी असताना ही बंदी झुगारत अन्न, औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून नगरचा मावा आसपासच्या सात जिल्ह्यात जात आहे. नगरच्या माव्याची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बंदी असलेल्या या माव्याची अवैध विक्री व वाहतूक सध्या जोरात आहे.  माव्याच्या आहारी जात  तरुण पिढी बर्बाद होत असतांना अन्न व औषध प्रशासन विभाग यावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गुटखा, पानमसाला यापेक्षा मावा खाण्याकडे अलीकडे तरुणांचा कल अधिक वाढला आहे. एक वेळ पानपट्टीचा मालक वेळेवर येणार नाही, पण तरुण मंडळी त्याच्या अगोदर हजर असतात. टपरी बंद झाली तरी मोबाईलवरून संपर्क साधून ‘अमूक ठिकाणी पुडी ठेवा, पैसे उद्या’, अशी विनंती मालकांना केली जाते. राज्यात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी लागू झाल्यानंतर राज्य सरकारने माव्याच्या विक्रीवर बंदी लागू केली. बंदी असली तरीही खाजगी वाहतूक करणार्‍या वाहनांच्या सहाय्याने माव्याची नगरच्या शेजारी असलेल्या पुणे, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यात वाहतूक होते. या सात जिल्ह्यात नगरच्या माव्याला खास मागणी आहे. या सात जिल्ह्यात मावा तयार होत नाही असे नाही, परंतु नगरचा मावा खाल्ल्याने ‘किक’ बसत असल्याने नगरच्या माव्याला पसंती दिली जाते.
नगर शहरात शंभरच्या आसपास मावा विक्रेते आहेत. तेथेच मावा विक्री होते. 120 , 160 , 300 , कलकत्ता मावा असे प्रकार आहेत. तंबाखू आणि चुनापाणीचे मिश्रण ठराविक वेळेपुरते एकत्र केले जाते. काही ठिकाणी त्यामध्ये विशिष्ठ पदार्थाचा समावेश केला जातो. ग्राहकांच्या समोरच मावा मळून तयार करत विक्री होते.

सातत्याने मावा खाण्यामुळे अनेकांचे तोंड नीट उघडत नाही. तिखट सहन होत नाही, अशा तक्रारी असूनही माव्याचा खप काही कमी होत नाही. एखाद्या पानपट्टीवर दिवसाला मिळणार नाही इतके उत्पन्न माव्याच्या विक्रीतून मिळू लागल्याने काही जणांनी मूळ व्यवसाय सोडून माव्यासाठीच खास पानपट्टी उघडली. एकेका तरुणाची माव्याची महिन्याची उधारी हजारांच्या घरात आहे. माव्याचा ‘करंट’ कर्करोगाला निमंत्रण देणारा असला तरी त्याचे परिणाम जाणवत नाहीत, तोपर्यंत मावा खायचे काही कमी करायचे नाही, अशी सवय काहींच्या अंगवळणी पडली आहे. सुरवातीच्या काळात अन्न प्रशासनाने काही तुरळक कारवाया केल्या, मात्र सध्या कारवाया नसल्यातच जमा आहेत. गुटखा किंवा सुगंधित तंबाखूची विक्री किंवा साठवणूक केल्यानंतर कायद्यात फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे.
गुटखा विक्रीही राजरोस सुरूच

कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी जिल्ह्यात अनेक गावांत माव्यासोबतच, गुटखा व पानमसाल्याची छुपी विक्री सुरू आहे. सुपारी, चुना व जाफरानी तंबाखूचे मिश्रण असलेला ‘मावा’ही सर्वत्र सर्रास विकला जातो. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतही सातत्य व समन्वयाचा अभाव तसेच या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जात नाही. अनेक ठिकाणी चार ते पाच पट अधिक दराने मावा, गुटख्याची विक्री होऊनही, व्यसनाची चटक लागलेल्यांकडून अशा महागड्या माव्याची खरेदी अगदी सहजपणे सुरू आहे.

कच्च्या मालाच्या विक्रेत्यांना ‘अभय’

मावा तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल नगरच्या बाजारपेठेत सहज उपलब्द्ध होत आहे. माव्याचा हा कच्चा माल विकणारे नगर शहरात जवळपास 25 ठोक विक्रेते आहेत. मावा विक्री करण्यावर बंदी असली तरी, मावा तयार करण्याच्या कच्च्या मालाच्या विक्रीवर बंदी नसल्याने कच्च्या मालाची विक्री खुलेआम सुरु आहे. कायद्यातील त्रुटींचा या व्यापार्‍यांना फायदा मिळत असून, ठोक विक्रेत्यांचे फावत आहे.