Tue, Jul 16, 2019 12:22होमपेज › Ahamadnagar › आता शिक्षक आमदार जिल्ह्याचा हवा!

आता शिक्षक आमदार जिल्ह्याचा हवा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ अस्तित्त्वात आल्यापासून नगर जिल्ह्याला एकदाही आमदारकीची संधी मिळाली नाही. आता ही संधी मिळण्याची आशा निर्माण झाली असतानाच जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या वाढती असल्याने पुन्हा एकदा नगर जिल्हा संधी दुसर्‍याच्याच पदरात टाकणार का? अशी चर्चा आता शिक्षक मतदारांमध्ये रंगू लागली आहे.

सन 1988 मध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ अस्तित्त्वात आला. यावर्षी झालेल्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्याचे टी. बी. पवार व 1994 च्या निवडणुकीत धुळ्याचे ज. यू. पवार, सन 2000 च्या निवडणुकीत नाशिकचे नानासाहेब बोरस्ते, 2006 च्या निवडणुकीत जळगावचे दिलीप सोनवणे व 2012 च्या निवडणुकीत नाशिकचे डॉ.अपूर्व हिरे हे निवडून आले होते.1988 मध्ये जिल्ह्यातून रा. ह. शिंदे, 1994 मध्ये एम.एस मरकड, 2000 मध्ये तुकाराम दरेकर, ग. वि. कुलकर्णी, 2006 च्या निवडणुकीत भाऊसाहेब कचरे व सुभाष कडलग, 2012 मध्ये राजेंद्र लांडे व सुनील पंडित आदींनी जिल्ह्यातून निवडणुका लढविल्या होत्या. दुर्देवाने आतापर्यंत एकदाही जिल्ह्याला संधी मिळाली नाही.

या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील इच्छुकांनी पूर्वीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यामुळे मतदार नोंदणीतही लक्ष घालून जिल्ह्यातून सुमारे 30 हजार शिक्षक मतदार नोंदले गेल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. तर अन्य इतर जिल्ह्यांत सुमारे 22 हजार मतदार असल्याची चर्चा आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाचे कार्यक्षेत्र अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार असे आहे. 2018 च्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातून प्रा. भाऊसाहेब कचरे, अप्पासाहेब शिंदे, सुनील पंडित हे तीन उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत.  जळगावमधून शाळीग्राम भिरुड, धुळ्यातून संदीप बेडसे रिंगणात आहेत. म्हणजे एकट्या नगर जिल्ह्यातून तीन उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

त्यामुळे सर्वांत जास्त मतदार असूनही जिल्हा पुन्हा एकदा शिक्षक आमदारकीला मुकतो की काय? अशी चर्चा  रंगू लागली आहे. आतापर्यंत शिक्षक लोकशाही आघाडीचे वर्चस्व कायम असल्याने शिक्षक लोकशाही आघाडीची उमेदवारीसाठी अनेकांचा आग्रह आहे. मात्र, यामध्येही फूट पडली आहे. आपल्यालाच टीडीएफची उमेदवारी असल्याचे सांगत आहेत. याबाबत खुलासे प्रतिखुलासे करण्यात येत आहे. टीडीएफच्या घटनेनुसार अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे जात असल्याने कार्याध्यक्षांनी ज्यांना उमेदवारी घोषित केली आहे, तेच अधिकृत उमेदवार असल्याचा खुलासा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक मतदारांमध्ये फिरत आहे. 

शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा!

नाशिक शिक्षक मतदारसंघ हा शिक्षकांचा मतदारसंघ आहे. मात्र त्या मतदारसंघात शिक्षक नसलेल्या व्यक्ती ही उमेदवारी करतात. शिक्षकांचे प्रश्‍न शिक्षकांनाच चांगले माहिती असल्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व शिक्षकानेच केले पाहिजे. शिक्षक लोकप्रतिनिधी निवडून गेल्यास शिक्षकांचे प्रश्‍न शासन दरबारी तोच चांगल्या प्रकारे मांडू शकत असल्याने शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा, अशा प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.


  •